Crime News : लष्करातील अधिकाऱ्याने (Army Officer) एका 30 वर्षीय ट्रक ड्रायव्हरच्या (Truck Driver) डोळ्यात गोळी मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मध्य प्रदेशात (Madhya Pradesh) हा सर्व प्रकार घडला आहे. जखमी ट्रक ड्रायव्हरवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अल्पवयीन मुलीचा व्हिडीओ शूट केल्याबद्दल एका लष्करी अधिकाऱ्याने त्याच्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने (service revolver) ट्रक ड्रायव्हरवर गोळी झाडली. ती गोळी ड्रायव्हरच्या डोळ्यात लागल्याची माहिती पोलिसांनी (MP Police) दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, याप्रकरणी पोलिसांनी आरोपी विकास तिवारी (28) याला अटक केली आहे. तर अल्पवयीन मुलीला चौकशीनंतर सोडून देण्यात आले आहे. विकास तिवारी हा लष्करातील जवान असून ते पटियाला येथे तैनात होता. तो मध्य प्रदेशातील रीवा जिल्ह्यातील कांती या त्याच्या मूळ गावी आला होता. तिवारीच्या लग्नाला सहा वर्षे झाली असून त्यांना चार वर्षांचा मुलगा आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, तिवारी शनिवारी अल्पवयीन मुलीसोबत गावातील एका मंदिरात जात असताना पीडित ब्रिजेंद्र कोरी (30) याने त्यांना पाहिले.


त्यानंतर कोरीने त्या दोघांचा व्हिडीओ काढण्यास सुरुवात केली. तसेच व्हिडीओ मुलीच्या कुटुंबियांना दाखवण्याची धमकी दिली. यानंतर त्याने तिथून पळ काढला. कोरी हा शेजारच्याच गावी राहत होता आणि त्याला विकास तिवारीच्या लग्नाची माहिती होती, असे पोलिसांनी सांगितले.


विकास आणि अल्पवयीन तरुणीने ब्रिजेंद्रचा स्कूटीवरुन पाठलाग केला. त्यांनी ट्रकचालक ब्रिजेंद्र कोरी राष्ट्रीय महामार्ग 30 वरील मंगळवनजवळील एका हॉटेलमध्ये पकडले. तिथे दोघांमध्ये जोरदार वादावादी झाली. त्यावेळी विकासने ब्रिजेंद्रला दोघांचा काढलेला व्हिडिओ डिलीट करण्यास सांगितले होते. ब्रिजेंद्रने ते करण्यास नकार दिला. यानंतर संतापलेल्या विकासने ब्रिजेंद्रवर गोळीबार सुरू केला. यानंतर ट्रक चालकाच्या डोळ्याला गोळी लागली. गंभीर जखमी ब्रिजेंद्रला रीवा येथील संजय गांधी वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.


दरम्यान, या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलीस अधीक्षक नवनीत भसीन यांनी सांगितले की, आरोपी विकासला पोलिसांनी अटक केली आहे. विकासवर भादंवि कलम 307 (हत्येचा प्रयत्न) अन्वये गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आली आहे.