Crime News : मध्य प्रदेशातील (MP Crime) सिधी जिल्ह्यात एका भाजप कार्यकर्त्याने एका गरीब मजुराच्या अंगावर लघुशंका केल्याची घटना ताजी असतानाच आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये एका व्यक्तीला चालत्या वाहनात दुसऱ्या व्यक्तीचे पायाचे तळवे चाटायला लावल्याचे समोर आले आहे. या संतापजनक घटनेचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये बोलेरो कारमधील चार-पाच जण तरुणाला मारहाण करताना दिसत आहेत. एवढेच नाही तर एक व्यक्ती एका तरुणाला त्याच्या पायाचे तळवे चाटायला सांगत आहे. त्यानंतर तरुणाच्या तोंडावर चापट मारायला सुरुवात करतो. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच पोलिसांनी (MP Police) दोघांना अटक केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याप्रकरणी मध्य प्रदेश पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, पीडित आणि आरोपी ग्वाल्हेर जिल्ह्यातील डबरा शहरातील रहिवासी आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, पीडित तरुणाला दुसर्‍या व्यक्तीने अनेक वेळा कानाखाली मारली आहे. तसेच आरोपी तरुणाला गोलू गुर्जर बाप है असे म्हणण्यास भाग पाडताना दिसत आहे. कारमध्येच हल्लेखोरांच्या साथीदाराने मोबाईलवरून व्हिडिओ शूट केला आहे. ग्वाल्हेर-डाबरा दरम्यान महामार्गावर धावणाऱ्या कारमध्ये हा सगळा धक्कादायक प्रकार घडला आहे.


यानंतर व्हिडिओमध्ये पीडित तरुण आरोपीच्या पायाचे तळवे चाटताना दिसत आहे. पीडित तरुणाला असे करण्यास भाग पाडल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. आरोपी पीडितेच्या तोंडावर वारंवार चापट मारताना आणि शिवीगाळ करताना दिसत आहे. दुसऱ्या एका व्हिडिओ व्हिडीओमध्ये आरोपी पीडितेच्या चेहऱ्यावर अनेक वेळा बूटाने मारताना दिसत आहे. कारमध्ये चालकासह सुमारे 5 तरुण असून, ते पीडित तरुणाला बेदम मारहाण करत आहेत.


व्हायरल व्हिडीओसोबत सोशल मीडियावर काही नावेही व्हायरल झाली आली असून मारहाण झालेला तरुण हा डाबरा येथील रहिवासी आहे. गोलू गुर्जर, तेजेंद्र आणि इतर अशी मारहाण करणाऱ्या तरुणांची नावे आहेत. व्हिडिओमध्ये एक तरुण म्हणतोय की पीडित तरुणेच माझं डोकं फोडलं होतं. पीडित तरुणाचे काही दिवसांपूर्वी डाबरा येथील गोलू गुर्जरच्या भावासोबत भांडण झाल्याचे म्हटलं जात आहे. आरोपीने ग्वाल्हेर येथील जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ एका ओळखीच्या व्यक्तीद्वारे फोन करून पीडित तरुणाला बोलावले आणि त्याचे अपहरण केले.


दरम्यान या प्रकराची दखल सरकारने घेतली आहे. या घटनेप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी दिली. डबरा उपविभागीय पोलिस अधिकारी विवेक कुमार शर्मा म्हणाले, "शुक्रवारी संध्याकाळी एका व्यक्तीला वाहनातून मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. व्हिडिओ क्लिप फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवली आहे. पीडितेच्या कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या तरतुदीनुसार त्या व्यक्तीचे अपहरण करून मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे."