ट्रेनमध्ये कुलगुरुंना आला Heart Attack; जीव वाचवण्यासाठी न्यायाधीशांची गाडी हिसकावून नेणाऱ्या मुलांवर दरोड्याचा गुन्हा
MP Crime News : मध्य प्रदेशात कुलगुरुंचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करणे त्यांच्या विद्यार्थ्यांना चांगलेच महागात पडलं आहे. कुलगुरुंचा जीव वाचवण्यासाठी न्यायमूर्तींची गाडी विद्यार्थ्यानी पळवून नेली होती. आता या विद्यार्थ्यांवर दरोड्याचा गुन्हा दाखल झाला आहे.
MP Crime News : मध्य प्रदेशात एका विद्यापीठाच्या कुलगुरुंचे प्राण वाचवण्याचा प्रयत्न करणे विद्यार्थ्यांना चांगलेच महागात पडलं आहे. मध्य प्रदेशातील पीके विद्यापीठाच्या कुलगुरूंचा जीव वाचवण्यासाठी विद्यार्थ्यांवर दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी कुलगुरुंचा जीव वाचवण्यासाठी रेल्वे स्थानकाबाहेर असलेली गाडी जबरजदस्तीने हिसकावून रुग्णालय गाठलं होतं. मात्र ही गाडी एका न्यायाधिशांची निघाल्याने एकच खळबळ उडाली. कुलुगुरुंचा जीव वाचवणाऱ्या मुलांवर आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, गुन्हा दाखल झालेले विद्यार्थी हे अभाविपचे कार्यकर्ते असल्याचे म्हटलं जात आहे. त्यामुळे सोमवारी रात्रभर अभाविपच्या कार्यकर्त्यांनी संबधित पोलीस ठाण्याच्या बाहेर ठिय्या आंदोलन केले.
गेल्या आठवड्यात रविवारी दिल्लीहून ग्वाल्हेरला येणाऱ्या दक्षिण एक्सप्रेसमध्ये ही धक्कादायक घडली. रात्रीच्या सुमारास शिवपुरीच्या पीके विद्यापीठाचे कुलगुरू रणजित सिंह यादव (68) हे त्यांच्या काही विद्यार्थ्यांसोबत दिल्लीहून ग्वाल्हेरला येणाऱ्या एक्स्प्रेसमध्ये होते. त्यावेळी ट्रेन आग्र्याला पोहोचताच रणजित यादव यांच्या छातीत दुखू लागले. यादव यांची प्रकृती ढासळत चालली होती. हा सगळा प्रकार पाहून त्यांच्यासोबतचे विद्यार्थी घाबरली आणि त्यांनी रेल्वेच्या हेल्पलाइन नंबरवर मदत मागितली.
ग्वाल्हेर स्थानक येताच विद्यार्थी ट्रेनमधून खाली उतरले आणि त्यांनी मदत शोधण्यास सुरुवात केली. त्यावेळी कोणतीही मदत न मिळाल्याने विद्यार्थ्यांना प्लॅटफॉर्म क्रमांक एक बाहेरील उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संजीव एस. काळगावकर यांची गाडी दिसली. विद्यार्थ्यांनी न्यायमूर्तींच्या चालकाला रणजित यादव यांना रुग्णालयात नेण्याची विनंती केली. मात्र चालकाने नकार दिल्याने विद्यार्थ्यांनी गाडीची चावी हिसकावून घेतली आणि यादव यांनी घेऊन जवळचे रुग्णालय गाठले. मात्र डॉक्टरांनी रणजित यादव यांची तपासणी केली आणि त्यांना मृत घोषित केले.
दरम्यान, दुसरीकडे पोलिसांना न्यायमूर्तींच्या गाडीवर दरोडा पडल्याची माहिती मिळताच त्यांनी तपास सुरु केला. पोलिसांनी शहरात नाकाबंदी सुरु केली. पोलिसांनी न्यायमूर्तींची गाडी जयआरोग्य रुग्णालयाजवळ उभी केलेली आढळली. यानंतर रेल्वे पोलिसांच्या तक्रारीवरुन पोलीस ठाण्यात विद्यार्थ्यांविरुद्ध दरोड्याच्या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र अभाविपाच्या कार्यकर्त्यांना याची माहिती मिळताच त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि आंदोलन सुरु केले.