भोपाळ: मध्य प्रदेशातील सत्तानाट्याच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी राज्यपाल लालजी टंडन यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी राज्यपालांना सोपवलेल्या पत्रात भाजपवर घोडेबाजाराचा आरोप केला. तसेच सभागृहात बहुमत चाचणी व्हावी, अशी मागणी कमलनाथ यांनी केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजपचे वर्तन अनैतिक आणि अनधिकृत आहे. ८ मार्चला भाजपने काँग्रेसच्या १९ आमदारांना चार्टर्ड विमानांनी बंगळुरूला नेले. तेव्हापासून हे आमदार एका रिसॉर्टमध्ये आहेत. त्यांचा कोणाशीही संपर्क होऊ शकत नाही. या आमदारांना लवकरात लवकर सोडण्यात यावे. येत्या १६ तारखेपासून मध्य प्रदेश विधानसभेच्या अधिवेशनाला सुरुवात होत आहे. यावेळी आम्ही बहुमत सिद्ध करण्यासाठी तयार असल्याचे कमलनाथ यांनी राज्यपालांना लिहलेल्या पत्रात म्हटले आहे.



मध्य प्रदेश विधानसभेत एकूण २३० जागा आहेत. यामध्ये काँग्रेसचे ११४ तर भाजपचे १०९ आमदार आहेत. तर समाजवादी पक्षाचा एक, बसपाचे दोन आणि चार अपक्ष आमदार आहेत. मात्र, ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या भाजप प्रवेशानंतर काँग्रेसचे २२ आमदार फुटल्याचे सांगितले जाते. त्यामुळे कमलनाथ सरकार अडचणीत आले आहे. त्यामुळे आता बहुमताच्या परीक्षेला सामोरे जाऊन सरकार राखण्यात कमलनाथ यशस्वी ठरणार का, हे पाहणे महत्वाचे ठरेल.