MP Accident : मध्य प्रदेशातील (MP News) सिधी जिल्ह्यात गुरुवारी एक मोठा अपघात घडला आहे. टिकरी मार्गाजवळ एका अनियंत्रित ट्रकने बोलेरो गाडीला चिरडल्याने 7 जणांचा मृत्यू झाला आहे. या भीषण दुर्घटनेत बोलेरो गाडीचा अक्षरक्षः चुराडा झाला. या घटनेनंतर पाच जणांचा जागीच मृत्यू (Accident News) झाला तर दोघांचा रुग्णालयात मृत्यू झाला. या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. अपघाताची माहिती मिळताच प्रशासनाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. स्थानिक पोलीस (MP Police) या प्रकरणाचा तपास करत असल्याची माहिती समोर आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सिधी जिल्ह्यातील बारम बाबा डोलजवळ हा भीषण रस्ते अपघात झाला. या अपघातामध्ये एक वेगवान ट्रक अनियंत्रित बोलेरोवर उलटला, ज्यात 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर दोन जण जखमी झाले. मृतांमध्ये दोन मुलांचाही समावेश आहे. तर जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गुरुवारी सकाळी 9.30 ते 10 वाजण्याच्या दरम्यान सिधी-टिकरी रस्त्यावर बरामबाबा डोळजवळ हा अपघात झाला. अनियंत्रित ट्रक अचानक खड्ड्यात अडकला आणि त्यानंतर तो समोरून भरधाव जाणाऱ्या बोलेरोवर उलटला. या अपघातात बोलेरो गाडीतील पाच प्रवासी जागीच ठार झाले.


या भीषण अपघातात यादव कुटंब ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. यादव कुटुंबिय लग्नावरुन परतत होते. लग्नानंतर परतत असताना गावात पोहोचण्यापूर्वीच हा अपघात झाला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी सांगितले की, कार रस्त्याच्या कडेला उभी होती आणि सर्व लोक त्यात बसले होते. काही वेळात समोरून येणारा अनियंत्रित ट्रक कारवर उलटला. हा अपघात एवढा भीषण होता की कारचा चक्काचूर झाला. त्यात बसलेले लोक गाडले गेले. यानंतर सर्वांनी त्यांना वाचवण्यासाठी धाव घेत पोलिसांना याची माहिती दिली.


दरम्यान, हा सर्व प्रकार पाहून रस्त्यावर एकच गोंधळ उडाला. काही लोकांनी पोलिसांना फोन केला, तर काही लोकांनी हॉस्पिटलला माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. मृतांमध्ये दोन लहान मुलांचाही समावेश असल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणाची सर्व बाजूंनी चौकशी करण्यात येत असल्याचे पोलिसांचे म्हटलं आहे.