नवी दिल्ली : आपल्या विविध मागण्यांसाठी ३० हजारांपेक्षा जास्त शेतकरी मुंबईत दाखल झाले आहेत. एकीकडे सरकार आम्ही शेतक-यांच्या मागण्या मान्य करणार आहोत, असे सांगत आहेत. तर दुसरीकडे भाजप खासदारानं या अन्नदात्या शेतक-यांवर माओवाद्याचं लेबल लावलं आहे. 


काय म्हणाल्या पूनम महाजन


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खासदार पूनम महाजन यांनी हे धक्कादायक वक्तव्य केलं असून त्या म्हणाल्या की, ‘शेतकऱ्यांचे प्रश्न योग्यच आहेत, मात्र यानिमित्तानं आंदोलनातून शहरी माओवाद डोकावतो आहे का? हे पाहावं लागेल’. शांततेत मुंबईपर्यंत आलेल्या या मोर्चाबद्दल एका मराठी वृत्त वाहिनीने भाजप खासदार पुनम महाजन यांना प्रतिक्रिया विचारली असता, त्यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनात असलेल्या लाल झेंड्याबद्दल आक्षेप घेतला. 


शेतकरी मोर्चा मुंबईत


उन्हातान्हातून पायी कापत शेतकरी नाशिकहून मुंबईत पोहोचले आहेत. अशा स्थिती लोकांना सहानुभूती देत, आधार देण्याऐवजी सत्ताधारी पक्षातील खासदारच माओवादाचं लेबल लावून शेतकऱ्यांची हेटाळणी करताना दिसत आहे. खासदार पूनम महाजन यांच्या वक्तव्याचा आता सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे.


कॉंग्रेसकडून टीका


काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने पुनम महाजन यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण म्हणाले, की पुनम महाजन यांना शेतकऱ्यांची थट्टा करण्याचा अधिकार नाही. रक्ताळलेल्या शेतकऱ्यांचा त्यांनी अपमान केला आहे. यासाठी पुनम महाजन यांनी माफी मागितली पाहिजे.