मुस्तान मिर्झा, झी मीडिया, उस्मानाबाद : 'आरक्षण गेलं खड्ड्यात! पदवीपर्यंत सर्वच जातीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण मोफत करा,' असे म्हणत खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी संताप व्यक्त केला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील देवळाली गावातील विद्यार्थी अक्षय शहाजी देवकर याने आपले आयुष्य संपवले. नुकत्याच झालेल्या दहावीच्या परीक्षेत त्याला 94% गुण मिळून सुद्धा चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळेल का ? या भीतीने त्याने गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेची माहिती ट्विटरवर देत संभाजीराजे यांनी आक्रमक भूमिका घेतली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कळंब तालुक्यातील देवळाली या गावच्या अक्षय देवकर याने दहावी मध्ये ९४. २० टक्के गुण मिळवले. पुढील शिक्षणासाठी त्याला लातूर येथील एका नामांकित महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा होता. तसा फॉर्म देखील त्याने भरला होता. मात्र पहिल्या यादीत त्याचं नाव न आल्याने आणि पुढे आपल्याला प्रवेश मिळेल का नाही ? या भीतीने त्याने आत्महत्या केल्याचा दावा त्याच्या कुटुंबीयांनी केलाय. 


अक्षय देवकर याचे वडील शहाजी गोविंद देवकर यांच्याकडे पाच एकर शेत आहे. त्यांना एक मुलगी आणि मुलगा असून मुलीचे लग्न झाले आहे. मागीलवर्षी पावसाने पाठ फिरवल्यामुळे सोयाबीन पिक हातातून गेल्यामुळे कर्जाचा डोंगर झाला होता. शहाजी यांचा मुलगा अक्षय हा लातुर येथील सानेगुरुजी विद्यालयात शिक्षण घेत होता. 


अक्षयचे आई-वडील शेतात काही पिकत नसल्यामुळे इतरांच्या शेतात मोल मजुरी करुन अक्षयच्या शिक्षणाला पैसे पाठवत होते. अक्षय हा अभ्यासात हुशार होता. दहावीच्या परीक्षेत त्याला 94.20 % टक्के गुण मिळाले होते. पुढील शिक्षणासाठी लातुर येथील नामांकित महाविद्यालयात प्रवेश मिळेल का? नाही हा प्रश्न अक्षयच्या मनात घर करुन होता. 



आकरावीच्या प्रवेशाची प्रक्रिया चालू असल्यामुळे सध्या तो देवळाली येथे राहत होता. दिनांक 20 जून रोजी वडिल हे शेतात व आई कार्यक्रमा निमित्ताने बाहेर गावी गेली होती. त्यामुळे अक्षय हा एकटाच घरात होता. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी कोण नसल्यामुळे अक्षय ने लोखंडी आडुला गळफास घेऊन आत्महत्या केली.