मुंबई : #kashmir सोमवारी राज्यसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काश्मीरमधील कलम ३७० रद्द करण्यात येण्याविषयीचा प्रस्ताव मांडला. शिवाय काश्मीरमधील अनुच्छेद ३५ A रद्दही करण्यात आला. या ऐतिहासिक निर्णयाची घोषणा केल्यानंतर सर्व स्तरांतून प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात केली. सरकारमध्ये भाजपच्या मित्रपक्षांपैकी एक असणाऱ्या शिवसेनेकडूनही या निर्णयाचं स्वागत करण्यात आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज्यसभेत बोलतेवेळी सदनासमोर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना दाद दिली. 'आज जम्मू- काश्मीर घेतलं, उद्या बलुचिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरही घेऊ', असा विश्वास व्यक्त करत देशाच्या पंतप्रधानपदी असणारे नरेंद्र मोदी हे अखंड भारताचं स्वप्न नक्कीच पूर्ण करतील, असं राऊत यांनी ठणकावून सांगितलं. 



 


देशाच्या इतिहासात १५ ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन, ८ ऑगस्ट हा क्रांतीदिन आणि ५ ऑगस्ट या दिवशी आणखी एक क्रांतीचा दिवस लिहिला गेला असल्याची प्रतिक्रिय़ा राऊत यांनी दिली. हा अतिशय कठीण आणि महत्त्वपूर्ण असा निर्णय घेतला खरा, पण त्याला विरोध हा होणारच असं म्हणत विरोध तर या ठिकाणी झोपा काढतोय या शब्दांत त्यांनी विरोधी पक्षांना टोला लगावला.