नवी दिल्ली : आंदोलक शेतकऱ्यांची ( Farmers Protest) भेट घेण्यासाठी विरोधकांचं शिष्टमंडळ गाझिपूर बॉर्डरवर गेले होते. मात्र विरोधकांच्या शिष्टमंडळाला पोलिसांनी अडवले आणि त्यांना शेतकऱ्यांना (Farmers) भेटू न देता रोखले आहे. या शिष्टमंडळात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांचाही समावेश होता. केंद्र सरकार असंवेदनशील असल्याची टीका यावेळी सुप्रिया सुळे यांनी केली. हे सरकार अतिशय असंवेदनशील आहे. शेतकऱ्यांना भेटण्यापासून आम्हाला रोखणे हे धक्कादायक, असे त्या म्हणाल्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज शेतकरी (Farmer) त्यांच्या मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत. दोन महिने झालेत. तरीही त्यांना न्याय मिळत नाही. बॉर्डरवर अशी स्थिती नाही. पाकिस्तान, चीन बॉर्डर मी गेले आहे. तिथे अशी परिस्थिती नाही. मात्र, येथे अशी धक्कादायक परिस्थिती आहे. हे आमचे शेतकरी आहेत. त्यांच्याशी चर्चा करु दिली जात नाही. त्यांना भेटू दिले जात नाही, याला काय म्हणावे, असा सवाल सुप्रिया सुळे यांनी यावेळी उपस्थित केला.



आम्ही चर्चेला आलोय आणि त्यांना आधार देण्यासाठी आलो आहोत. आम्ही सगळे खासदार पोलीस अधिकाऱ्यांना विनंती करणार आहोत. जर त्यांनी अगदीच पुढे जाऊ दिले नाही तर आम्ही लोकसभा अध्यक्षकांकडे जाणार आणि त्यांना येथील परिस्थिती सांगणार. लोकसभा अध्यक्ष हे सगळ्यांचे असतात, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.


गेले सुमारे 70 दिवसांपासून हे शेतकरी या भागात आंदोलन करीत आहेत.सरकारने त्यांची योग्य दखल घेण्याची गरज आहे. आपल्या संस्कृतीत 'अन्नदाता सुखी भव' म्हटले जाते. शेतकरी हा आपला अन्नदाता आहे. तो सुखी रहावा यासाठी केंद्र सरकारने एक पाऊल पुढे येऊन त्यांचे गाऱ्हाणे ऐकून घेऊन त्यावर समाधानकारक तोडगा काढणे आवश्यक आहे, अशी आम्हा सर्वांची भावना आहे, असे त्यांनी म्हटले आहे.