मुंबई : कोरोना व्हायरसचा धोका दिवसागणिक वाढताना दिसत आहे. भारतात कोरोना रुग्णांची संख्या १४७ वर पोहोचली आहे. त्यामुळे प्रत्येक जण स्वत:ची योग्य ती काळजी घेताना दिसत आहे. भाजपचे खासदार आणि माजी रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून स्वत:ला क्वारंटाईन करून घेतले आहे. त्यांच्या राहत्या घरी क्वारंटाईनमध्ये राहण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. यापूर्वी परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी स्वतःला वेगळं ठेवलं होतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एएनआयने दिलेल्यावृत्तानुसार, सुरेश प्रभू यांनी स्वत:ला १४ दिवसांसाठी क्वारंटाईन करून घेतले आहे. कोरोना संसर्गाची चाचणी निगेटिव्ह आल्या नंतरही त्यांनी एकांतवासात राहण्याचा निर्णय घेतला आहे. प्रभू हे १० मार्च रोजी सौदी अरेबियात शेरपास बैठकीत सहभाग घेऊन परतले आहेत. 



संपूर्ण जगभरात आतापर्यंत १ लाख ९८ हजार ७१४ कोरोनाग्रस्त रुग्ण सापडले आहेत. तर ७ हजार ९८९ रुग्णांचा या धोकादायक व्हायरसमुळे बळी गेला आहे. महत्त्वाचं म्हणजे ८२ हजार ७७९ रूग्ण या आजारातून सुखरूप वाचले आहेत. 


परंतू, राज्यात कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. महाराष्ट्रात आणखी एक कोरोनाचा रुग्ण आढळला आहे. पुण्यात हा रुग्ण आढळल्याची माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली. पुण्यात आढळलेल्या या नव्या रुग्णामुळे आता येथील एकूण रुग्णसंख्या १८वर पोहोचली आहे. तर, राज्याच हा आकडा ४२वर गेला आहे.