खासदारांचं इनक्रिमेंट! आता मिळणार एवढा पगार
खासदारांच्या वेतन आणि भत्ता समितीनं वेतनवाढीला मंजुरी दिली आहे.
नवी दिल्ली : खासदारांच्या वेतन आणि भत्ता समितीनं वेतनवाढीला मंजुरी दिली आहे. यामुळे खासदारांचं मासिक वेतन ४५ हजार रुपयांनी वाढून ७० हजार रुपये करण्यात आलं आहे. तसंच खासदारांचा फर्निचर भत्ता ७५ हजार रुपयांनी वाढून १ लाख रुपये करण्यात आलाय.
खासदारांच्या कार्यालयातल्या खर्चाचा भत्ता ४५ हजार रुपयांनी वाढून ६० हजार रुपये झाला आहे. वाढलेलं हे वेतन आणि भत्ता खासदारांना १ एप्रिलपासून मिळणार आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि न्यायाधीशांच्या पगारामध्येही वाढ करण्यात आली होती.
प्रत्येक ५ वर्षांनी वाढणार वेतन
खासदारांचं वेतन आता प्रत्येक ५ वर्षांनी वाढणार आहे. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अर्थसंकल्पामध्ये याबाबत प्रस्ताव दिला होता.
एका खासदारावर एवढा खर्च
सध्या खासदाराला महिन्याला ५० हजार रुपयांचं वेतन, ४५ हजार रुपये निर्वाचन क्षेत्र भत्ता आणि अन्य सुविधांचा समावेश आहे. सरकार सध्या एका खासदारावर जवळपास २.७ लाख रुपये खर्च करतं. मागच्या ६ वर्षांमध्ये खासदारांचं वेतन ४ वेळा वाढवण्यात आलं आहे.