श्रीनगर: आज आम्हाला अटलबिहारी वाजपेयी यांची सर्वात जास्त उणीव जाणवतेय, असे वक्तव्य जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री व पीडीपी प्रमुख मेहबुबा मुफ्ती यांनी केले आहे. गेल्या काही दिवसांपासून लष्करी हालचाल वाढल्यामुळे काश्मीरमधील परिस्थितीत अत्यंत तणावपूर्ण झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या पार्श्वभूमीवर मेहबुबा मुफ्ती यांनी हे वक्तव्य केले. भाजपमध्ये असूनही अटलबिहारी वाजपेयी यांना काश्मिरी जनतेविषयी सहानुभूती होती. त्यांनी काश्मीरमधील जनतेचे प्रेम कमावले होते. आज त्यांची सर्वाधिक उणीव जाणवत असल्याचे ट्विट मुफ्ती यांनी केले आहे. 


जम्मू-काश्मीर सरकारने रविवारी रात्रीपासून श्रीनगर जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश लागू केले. १५ ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्यदिनाच्या मध्यरात्रीपर्यंत ही जमावबंदी लागू राहील. याशिवाय, रविवारी संध्याकाळपासून परिसरातील मोबाईल, ब्रॉडबँड, इंटरनेट आणि केबल टीव्ही सेवाही बंद करण्यात आल्याचे वृत्त आहे. 


याशिवाय, काश्मीरमधील स्थानिक पक्षांच्या प्रमुखांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. यामध्ये माजी मुख्यमंत्री व पीडीपीच्या प्रमुख मेहबुबा मुफ्ती आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांचा समावेश आहे. 



सरकारच्या आदेशानुसार सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच पुढील आदेश येईपर्यंत काश्मीरमधील शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याशिवाय, कोणतीही सार्वजनिक सभा आणि मोर्चा काढण्यासही मज्जाव करण्यात आला आहे.