नवी दिल्ली : पूर्वांचलचा कुख्यात डॉन प्रेम प्रकाश उर्फ मुन्ना बजरंगी याची बागपत जेलमध्ये हत्या झाली आहे. मुन्ना बजरंगी याची आज कोर्टात सुनावणी होती आणि त्याला झांसी येथून बागपतला आणण्यात आलं होतं. बसपाचे माजी आमदार लोकेश दीक्षित यांच्याकडे खंडणी मागितल्याप्रकरणी बागपत कोर्टामध्ये मुन्नाला हजर करण्यात येणार होतं. पण तुरुंगातच त्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. तुंरुगातच त्याच्या हत्येने अधिकाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. पोलीस आता संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुन्ना बजरंगी याच्या पत्नीने आधीच त्याच्या हत्येची शक्यता वर्तवली होती. याआधी झांसी जेलमध्ये देखील मुन्नावर हल्ला झाला होता. मुन्ना बजरंगीची पत्नी सीमाने म्हटलं होतं की, 'माझ्य़ा पतीला जीवाचा धोका आहे. यूपी एसटीएफ आणि पोलीस त्यांचा एनकाउंटर करण्याच्या तयारीत आहे. झांसी जेलमध्ये मुन्ना बजरंगीवर जीवे मारण्यासाठी देखील हल्ला झाला. काही प्रभावी नेते आणि अधिकारी मुन्नाची हत्या करण्याची षड्यंत्र रचत आहे. मुन्ना झांसी तुरुंगात 1 वर्षापासून बंद होता. हत्येची सुपारी तो घ्यायचा. जौनपूरच्या कसेरूपूरेदयाल गावचा तो राहणारा होता. मुन्ना बजरंगीचं नेटवर्क मुंबई, पश्चिम बंगाल, हरियाणा आणि पूर्व उत्तर प्रदेशपर्यंत पसरलेलं होतं.