सासरी गेलेल्या जावयाची हत्या! पत्नी, प्रियकर, सासू अन् मेव्हण्याला अटक
Murder Mystery Solved: मृतदेह सापडल्यानंतर त्याची ओळख पटवण्याचं आव्हान पोलिसांसमोर होतं. पोलिसांनी हा मृतदेह कोणाचा आहे याची माहिती मिळवण्यासाठी तांत्रिक बाबींची मदत घेतली.
Murder Mystery Solved: बिहारमधील कटिहार जिल्ह्यात एक फारच धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या ठिकाणी घडलेल्या एका हत्या प्रकरणामध्ये मरण पावलेल्या व्यक्तीची पत्नी, पत्नीचा प्रियकर, सासू आणि मेव्हण्याला अटक केली आहे. खैरा बहियार येथे 13 जून रोजी एका 35 वर्षीय तरुणाचा मृतदेह सापडला होता. मात्र या मृतदेहाची ओळख पटली नव्हती. नियमाप्रमाणे पोलिसांनी शवविच्छेदनानंतर 3 दिवसांनी मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. या प्रकरणामध्ये पोलिसांनी सखोल चौकशी केली असता एक धक्कादायक खुलासा झाला.
पोलिसांनी घरी छापा टाकला
या हत्याप्रकरणासंदर्भात चौकशी करण्यासाठी पोलिसांनी एक टीम तयार केली. आधी मृतदेह कोणाचा होता हे शोधणं महत्त्वाचं होतं. मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी खबऱ्यांची तसेच तांत्रिक मदत घेण्यात आली. काही दिवसांनी हा मृतदेह खगडिया येथील भदाश गावात राहणाऱ्या नीरज महतोचा होता अशी माहिती समोर आली. कटिहार पोलिसांनी मरण पावलेल्या नीरजचं घर गाठलं. येथे जाऊन चौकशी केली असता शेजाऱ्यांकडून नीरज मागील 10 दिवसांपासून बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. नीरजची सासरवाडी पोठिया पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या बखरी गावातील असल्याचं समजलं. यानंतर पोलिस स्टेशनचे प्रमुख संजय पांडे यांच्या नेतृत्वाखालील एका टीमने छापेमारी केली असता घरात कोणीच नव्हतं.
दोन महत्त्वाच्या गोष्टी पोलिसांना समजल्या
तपासामध्ये पोलिसांना 2 महत्त्वाच्या गोष्टी समजल्या. नीरज हा गतीमंद होता. तसेच खगडिया येथे राहणाऱ्या बखेरा यादवबरोबर नीरजच्या पत्नी सोनी देवीचे प्रेमसंबंध होते हे ही पोलिसांना समजलं. दोघांना लग्न करायचं होतं. यासाठी सोनी देवीची आई निर्माला देवी यांचा पाठींबा होता. त्यामुळेच नीरज हा सासरी पोहचल्यानंतर या सर्वांनी मिळून एक प्लॅन केला. या सर्वांनी मिळून नीरजला मारहाण केली. त्यानंतर नीरजची हत्या करुन पत्नी सोनी, सासू निर्मला, मेव्हणा आणि प्रियकर बखेराने मृतदेह शेतात फेकून दिला.
अनेकांना अटक
13 जून रोजी गवत कापताना महिलांना या मृतदेहाचा हात दिसला. त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. हत्येचा खुलासा झाल्यानंतर पोलिसांनी नीरजची पत्नी, सासू आणि मेव्हण्याला अटक केली असून या गुन्ह्यात या कुटुंबाला साथ देणाऱ्या नीरजच्या पत्नीच्या प्रियकराचा शोध सुरु आहे. या घटनेमुळे गावामध्ये एकच खळबळ उडाली असून घरातील सर्वांनीच जावयाला संपवण्यासाठी कट रचल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.