दिल्ली पोलीस दलातील हेड कॉन्स्टेबलला दोन वर्षांपूर्वी आपल्या महिला सहकाऱ्याची हत्या केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. गळा दाबून हत्या केल्यानंतर त्याने तिचा मृतदेह कालव्यात फेकून दिला होता. कालव्यात फेकताना त्याने मृतदेहला दगड बांधला होता. यामुळे मृतदेह कालव्यातून बाहेर आलाच नाही. तब्बल दोन वर्ष आरोपी पोलिसांना चकवा देत होता. पण अखेर पोलिसांनी आरोपी सुरेंद्र राणा याला अटक केली आहे. या अटकेसह पीडित मोना यादवच्या कुटुंबाला न्याय मिळाला आहे, पण त्यासाठी त्यांना दोन वर्षं पोलीस ठाण्याच्या पायऱ्या झिजवत संघर्ष करावा लागला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आरोपीला अटक केल्यानंतर त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी कालव्यातून मृतदेह ताब्यात घेतला. पोलीस तपासात खुलासा करण्यात आला आहे की, आरोपी दोन वर्षांपासून पोलिसांची दिशाभूल करत होता. यादरम्यान त्याने आपण हत्या केल्याचं सर्वांपासून लपवून ठेवलं होतं. आपलं हे गुपित उलगडू नये यासाठी त्याने एका कॉलगर्लची मदतही घेतली होती. 


महिला कॉन्स्टेबल मोनाच्या हत्येनंतर हवालदार सुरेंद्र सिंग याने आपल्या मेहुणा रवीनच्या माध्यमातून मोनाच्या नातेवाईकांची दिशाभूल करण्यात कोणतीही कसर सोडली नाही. पोलिसांनी अटक करण्यापूर्वी दोन वर्षे आरोपी हवालदार त्याचा मेहुणा रवीन याच्यामार्फत मोनाच्या बुलंदशहरमधील नातेवाईकांना फोन करत असे. आपण मोनाचे पती असल्याचं तो खोटं सांगत असे. 


नातेवाईकांशी बोलताना तो मोना आपल्या इच्छेने बेपत्ता झाली असून, ती आपल्या एका पुरुष मित्रासह आनंदाने राहत असल्याचं सांगितलं होतं. तसंच तिला शोधण्याची गरज नाही असा दिलासाही देत असे. इतकंच नाही तर पोलिसांना संशय येऊ नये म्हणून सुरेंद्र वेळोवेळी मुखर्जी नगर पोलीस ठाण्यात जात असे. यावेळी तो एकटाच किंवा मोनाच्या नातेवाईकांना सोबत घेऊन तपासाची माहिती घेण्यासाठी पोलीस ठाण्यात जायचा. 


कॉलगर्लसह फिरायला गेला


आरोपी सुरेंद्र गेल्या एका वर्षात कॉलगर्लसह देहरादून, ऋषिकेश आणि मसुरी येथे फिरण्यासाठी गेला होता. तिथे तो वेगवेगळ्या हॉटेलांमध्ये वास्तव्यास होता. तेथून निघताना तो सोनियाची काही कागदपत्रं हॉटेलमध्ये मुद्दामून सोडून जात असे. जेणेकरुन ह़ॉटेलमधून मोनाच्या नातेवाईकांना फोन जाईल आणि ते मोना कागदपत्रं विसरुन गेली आहे असं सांगतील. 


नातेवाईकांच्या या माहितीच्या आधारे पोलीस जेव्हा तपास करण्यासाठी या हॉटेल्समध्ये दाखल झाले तेव्हा त्यांना मोना तिथे राहण्यास आली होती असं सांगण्यात आलं. यामुळे पोलिसांनाही मोनाची आई-वडिलांकडे परत जाण्याची इच्छा नाही असं वाटू लागलं होतं. 


2018 मध्ये झाली होती भेट


2018 मध्ये पीसीआर युनिटमध्ये नोकरी करत असताना सुरेंद्र आणि मोना यांची भेट झाली होती. यानंतर दोघांची मैत्री आणि नंतर प्रेमात रुपांतर झालं. आरोपी सुरेंद्रने आपण विवाहित असल्याचं मोनापासून लपवून ठेवलं होतं. दरम्यान, लग्नासाठी तो मोनावर दबाव टाकत होता. पण ती तयार होत नव्हती. यामुळे सप्टेंबर 2021 मध्ये सुरेंद्रने मोनाचं अपहरण करत तिची हत्या केली. त्याने मृतदेहाला दगड बांधून कालव्यात फेकून दिला. 


2020 मध्ये मोनिकाची युपी पोलिस उपनिरीक्षक म्हणून निवड झाली, त्यानंतर तिने दिल्ली पोलीस खात्यातून राजीनामा दिला. यासोबतच ती नागरी सेवा परीक्षेची तयारी करत होती.


मोनाच्या बहिणीने दिलेल्या माहितीनुसार, सुरेंद्र नेहमी त्यांच्या घरी येत असे. त्याच्या मनात वाईट हेतू असल्याची शंका आम्हाला कधी आली नाही. सुरेंद्र तिला बेटा म्हणायचा, तसंच काळजीही घ्यायचा. पण आम्हाला कधी संशय आला नाही. 2021 मध्ये मोना बेपत्ता झाली असता आम्ही त्याला विचारलं असता, आपल्याला काहीच माहिती नसल्याचं त्याने सांगितलं होतं. इतकंच नाही तर मोनाच्या बहिणीने 2021 मध्ये पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाख केली तेव्हा सुरेंद्र तिच्यासोबत होता. 


मोनाच्या कुटुंबाची दिशाभूल करण्यासाठी सुरेंद्रने एका महिलेला लस दिली आणि मोनाच्या नावावर कोविड प्रमाणपत्र मिळवलं होतं. "आम्ही सुरेंद्रवर संशय घेण्यास सुरुवात केली होती, पण आमच्याकडे कोणताही पुरावा नव्हता. आम्ही मुखर्जी नगर पोलिस ठाण्यात पोलिसांशी बोललो तेव्हा ते म्हणाले, 'तुझी बहीण पळून गेली'. आमचे कुटुंब उध्वस्त झाले, पण मी आशा सोडली नाही," असं तिच्या बहिणीने सांगितलं. 


आपल्या बहिणीच्या हत्येचं सत्य उलगडताना करावा लागलेला प्रवास उलगडताना मोनाच्या मोठ्या बहिणीला अश्रू अनावर होत होते. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या कार्यालयात बोलताना आपल्या बहिणीचं स्वप्न कशी राख झाली सांगताना ती अनेकदा बेशुद्धही पडली. पोलिसांनी आरोपी सुरेंद्रसह त्याला मदत करणाऱ्या दोन्ही मेहुण्यांनाही अटक केली आहे. 


दोन महिन्यांपूर्वी मोनाच्या बहिणीने दिल्ली पोलीस आयुक्त संजय अरोरा यांची भेट घेतली होती. यावेळी तिने सगळा घटनाक्रम उलगडला होता. यानंतर हे प्रकरण क्राइम ब्रांचकडे सोपवण्यात आलं. त्यांनी दोन महिन्यात गुन्ह्याचा उलगडा केला. अखेर 2 वर्षांनी मोनाच्या हत्येचा उलगडा झाला असून, तिला न्याय मिळाला आहे. पण यासाठी तिच्या कुटुंबाला फार संघर्ष करावा लागला. आरोपीला कठोर शिक्षा दिली जावी अशी मागणी त्यांनी केली.