Crime News In Marathi: 90 वर्षांच्या वृद्ध महिलेची गळा चिरुन हत्या करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. शैल कुमारी असं या वृद्ध महिलेचे नाव असून उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. वृद्ध महिलेची जेव्हा हत्या करण्यात आली तेव्हा ती घरात एकटीच होती. याचाच फायदा आरोपींनी घेतला होता. पोलिसांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली असून वृद्धेची हत्या का संपत्तीच्या कारणावरुन करण्यात आली असावी असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घरात कोणत्याही प्रकारची लूटमार किंवा झटापटीच्या खुणा दिसत नाहीये.  प्रॉपर्टीच्या कारणावरुनच महिलेची हत्या करण्यात आल्याची शंका उपस्थित करण्यात येत आहे. मात्र, अद्याप हे स्पष्ट झाले नाहीये. धक्कादायक म्हणजे, महिलेला चार मुलं आहेत. तरीदेखील ती एकटीच राहत होती. महिलेचा मोठा मुलगा लंडन येथे स्थायिक झाला आहे. तर, दुसरा मुलगा फॉरेंन्सिक विभागात कार्यरत होता तर आता आपल्या कुटुंबासह लखनौ येथे राहतो. त्याचबरोबर महिलेची इतर दोन मुलं त्यांच्या कुटुंबासोबत वेगळी राहतात. 


कुटुंबियांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, सकाळी त्यांचे वृद्धेसोबत बोलणं झालं होतं. मात्र संध्याकाळी फोन केल्यावर तिने फोनच उचलला नाही. अनेकदा फोन करण्यात आले पण काहीच उत्तर आलं नाही. त्यामुळं त्यांनी शेजाऱ्यांना फोन केला. जेव्हा शेजाऱ्यांनी घरात जाऊन पाहिलं तेव्हा शैल कुमारी रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. त्यांनी लगेचच पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. 


90 वर्षीय वृद्धेची हत्या प्रकरण गुंतागुंतीचे ठरले आहे. या महिलेचे शत्रू कोण असू शकतात, असा सवाल उपस्थित होत आहे. तसंच, घरात कोणत्याही प्रकारची लूटमार किंवा चोरी करण्यात आल्याचेही दिसत नाहीये. कदाचित, आरोपींनी महिला घरात एकटीच राहते हे माहिती असेल आणि म्हणूनच त्यांनी असा कट रचला असेल का?, असे सवाल उपस्थित होत आहेत. त्याचबरोबर, चार मुलं असूनही वृद्ध महिला घरात एकटीच का राहायची, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.