Baba Ram Rahim New Video: रेप प्रकरणात पॅरोल मिळाल्यानंतर बाबा राम रहीमचा नवा Music Video; देतोय देशभक्तीचे धडे
Murderer Rapist Convicted Gurmeet Ram Rahim Music Video: सध्या गुरमीत राम रहीम त्याच्या बागपत येथील आश्रमामध्ये राहत असून तिथूनच त्याने एक म्युझिक व्हिडीओ लॉन्च केला आहे. या व्हिडीओमधून तो देशभक्तीबरोबरच व्यसनांच्या आहारी जाऊ नका असा संदेश देताना दिसतोय.
Murderer Rapist Convicted Gurmeet Ram Rahim Music Video: कायद्याच्या दुष्टीने नक्कीच गुरमीत राम रहीम (Gurmeet Ram Rahim) बलात्कार (Rape) आणि हत्येच्या प्रकरणामधील आरोपी आहे. मात्र हरियाणा सरकारचा त्याच्यावर वरदहस्त असल्याच्या चर्चा राज्यामध्ये आहेत. हरियाणा सरकार या बाबाला कधी फरलो तर कधी पॅरोलच्या नावाखाली तुरुंगातून मुक्त करताना दिसत आहे. मागील 14 महिन्यांमध्ये चौथ्यांदा आणि तीन महिन्यामध्ये दुसऱ्यांदा गुरमीत राम रहीमला तुरुंगातून सुट्टी देण्यात आली आहे. सध्या या बाबाकडे पाहिल्यास कोणीही त्याला आरोपी म्हणणार नाही.
पॅरोलवर बाहेर आला बाबा
पॅरोलवर तुरुंगामधून बाहेर आल्यानंतर 'लव्ह चार्जर' गाण्यामुळे प्रसिद्ध झालेल्या राम रहीम बाबाने एक नवा म्युझिक व्हिडीओ लॉन्च केला आहे. व्हिडीओमध्ये तो एका ओपन जीपमधून एन्ट्री करताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये माजी राष्ट्रपती आणि अनेक खेळाडूंनी बाबाला भेट दिल्याच्या व्हिडीओही क्लिप्सही वापरण्यात आल्या आहेत. सध्या गुरमीत राम रहीमला कोणी बागपत येथील आश्रमामध्ये जाऊन पाहिल्यास त्यांचा थाटमाट पाहून कोणालाही विश्वास बसणार नाही की ही व्यक्ती हत्या आणि बलात्कारासारख्या प्रकरणांमध्ये आरोपी आहे. तुरुंगामधून बाहेर आल्यानंतर हा 'लव्ह चार्जर' फेम बाबा फारच मुक्तपणे वावरताना दिसतोय.
प्रतिमा चमकवण्याचा प्रयत्न
गुरमीत राम रहीमने आपल्या या अल्बममधून 'देश की जवाना' नावाचं गाणं रिलीज केलं आहे. या व्हिडीओत गुरमीत राम रहीम फारच वेगळ्या अंदाजामध्ये दिसत आहे. व्हिडीओ अल्बममध्ये देशभक्तीवरील गाण्यांच्या आढून गुरमीत राम रहीम आपली इमेज चमकवण्याचा प्रयत्न करत आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून बाबा राम रहीम आपली प्रतिमा फार स्वच्छ आणि निर्मळ असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. राम रहीमची मानलेली मुलगी हनीप्रीतने सोशल मीडियावर लिहिलेल्या पोस्टमध्ये हे गाणं प्रदर्शित होत असल्याने आपण फार एक्सायटेड आहोत, असं म्हटलं आहे.
काय संदेश देण्यात आला आहे?
बाबा राम रहीमच्या या व्हिडीओमध्ये डेऱ्यातील काही स्वयंसेवकही दिसत आहेत. व्हिडीओची थीम ड्रग्स अशी आहे. या व्हिडीओंच्या माध्यमातून बाबा राम रहीम तरुणांना अंमली पदार्थांचं सेवन करु नये असा सल्ला देताना दिसत आहे. या माध्यमातून आपण समाजउपयोगी संदेश देऊन समाजाप्रती आपली जबाबदारी पार पाडत असल्याचं दाखवण्याचा बाबा राम रहीमचा प्रयत्न स्पष्टपणे दिसून येत आहे.
राज्य सरकारवर टीका
बाबा राम रहीमला वारंवार तुरुंगातून सोडलं जात असल्याने राज्य सरकारला विरोधकांनी लक्ष्य केलं आहे. एका ठराविक व्यक्तीलाच या सुविधांचा एवढ्या वेळा लाभ कसा मिळतो असा सवाल विरोध उपस्थित करत आहेत.