मुंबई : पूर्व चंपारण जिल्ह्यातील कैथवालिया भागात सर्वात मोठं हिंदू मंदिर बांधलं जाणार आहे अशी माहिती समोर आली आहे. या विराट रामायण मंदिराचं (Virat Ramayan Mandir) काम सुरू होणार आहे. परंतु त्यापूर्वीच एक अशी गोष्ट समोर आली आहे. ज्यामुळे सर्वच आश्चर्यचकीत झाले आहेत. माहितीनुसार एका मुस्लिम कुटुंबाने या विराट रामायण मंदिरासाठी आपली 2.5 कोटींची जमीन दान केली आहे. त्यांच्या या कामामुळे त्यांनी देशात जातीय सलोख्याचे एक उत्तम उदाहरण सर्वासमोर ठेवलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाटणा येथील महावीर मंदिर ट्रस्टचे प्रमुख आचार्य किशोर कुणाल यांनी सोमवारी सांगितले की, ही जमीन गुवाहाटी येथे राहणारे पूर्व चंपारण येथील व्यापारी इश्तियाक अहमद खान यांनी दान केली होती.


कुणाल म्हणाले, "त्यांनी अलीकडेच पूर्व चंपारणमधील केसरिया उपविभागाच्या निबंधक कार्यालयात मंदिराच्या बांधकामासाठी आपल्या कुटुंबाच्या मालकीची जमीन दान करण्याशी संबंधित सर्व औपचारिकता पूर्ण केल्या आहेत."


आचार्य किशोर कुणाल म्हणाले की, इश्तियाक अहमद खान आणि त्यांच्या कुटुंबीयांनी दिलेली ही देणगी सामाजिक सलोखा आणि दोन समाजातील बंधुभावाचे उत्तम उदाहरण आहे. तसेच त्यांच्या या मदतीशिवाय हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकारणे कठीण झाले असते, असं देखील ते म्हणाले.


या मंदिराच्या उभारणीसाठी आतापर्यंत महावीर मंदिर ट्रस्टला 125 एकर जमीन मिळाल्याचे त्यांनी सांगितले. ट्रस्टला लवकरच या परिसरात आणखी 25 एकर जागा मिळणार आहे.


चंपारण येथील विराट रामायण मंदिर 215 फूट उंच असलेल्या कंबोडियातील 12व्या शतकातील जगप्रसिद्ध अंगकोर वाट संकुलापेक्षाही उंच असल्याचे म्हटले जाते.


या चंपारणच्या संकुलात उंच शिखरांसह 18 मंदिरे असतील आणि त्याच्या शिवमंदिरात जगातील सर्वात मोठे शिवलिंग असेल. याचा एकूण बांधकाम खर्च अंदाजे 500 कोटी रुपये आहे. यासाठी ट्रस्ट लवकरच नवी दिल्लीतील नवीन संसद भवनाच्या बांधकामात गुंतलेल्या तज्ञांचा सल्ला घेईल. ज्यानंतर याच्य कामाला सुरूवाती केली जाईल.