निवडणुकीत काँग्रेसचा विजय झाला तर मुस्लीम लीगचा व्हायरस देशभरात पसरेल- योगी आदित्यनाथ
पुन्हा एकदा देशासमोर असे संकट उभे ठाकले आहे, हिरवी निशाणे पुन्हा फडकून लागली आहेत.
लखनऊ: लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि मुस्लीम लीगचा विजय झाला तर हा व्हायरस देशभरात पसरेल, असे वक्तव्य उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले. योगी आदित्यनाथ यांनी शुक्रवारी ट्विट करून यासंदर्भात भाष्य केले. त्यांनी म्हटले की, मुस्लीम लीग हा खूपच घातक व्हायरस आहे. काँग्रेसला त्याची लागण झालेली आहे. मात्र, आगामी निवडणुकीत काँग्रेस पक्ष जिंकला तर देशभरात या व्हायरसचा फैलाव होईल, असे योगी आदित्यनाथांनी सांगितले.
मुस्लीम लीगच्या व्हायरसची लागण झालेले कोणीही वाचू शकत नाही. देशातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसला याची लागण झाली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा विजय झाला तर काय होईल, याचा फक्त विचार करा. यानंतर हा व्हायरस देशभरात पसरेल. १८५७ साली झालेल्या ब्रिटीशांविरोधात झालेल्या उठावाच्यावेळी संपूर्ण देश मंगल पांडेसोबत ठामपणे उभा राहिला. मात्र, त्यानंतर देशात मुस्लीम लीगचा व्हायरस उत्पन्न झाला. हा व्हायरस असा काही फैलावला की देशाची फाळणी झाली. पुन्हा एकदा देशासमोर असे संकट उभे ठाकले आहे, हिरवी निशाणे पुन्हा फडकून लागली आहेत. काँग्रेसला या व्हायरसची अगोदरच लागण झाली आहे. तेव्हा तुम्ही सावध राहा, असे योगी आदित्यनाथ यांनी ट्विटच्या माध्यमातून सांगितले आहे.
राहुल गांधी यांनी गुरुवारी केरळच्या वायनाड मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. या मतदारसंघात मुस्लीम लीगचे प्राबल्य आहे. केरळच्या २० पैकी १६ जागांवरून काँग्रेस निवडणूक लढवत आहे. तर उर्वरित चार जागांपैकी दोन जागांवर मुस्लीम लीग, एका जागेवर केरळ काँग्रेस (मनी) आणि सोशालिस्ट पार्टी ( आरएसपी) निवडणूक लढवत आहे.