बंगळुरुमध्ये एका मुस्लीम तरुणीशी काही मुस्लीम तरुणांनीच गैरवर्तन केलं. तरुणी आपल्या हिंदू मित्रासह फिरण्यासाठी गेली होती. जेव्हा ती रस्त्यावर बाईकवरुन खाली उतरली, तेव्हा मुस्लीन तरुणांनी तिला घेरलं आणि वाद घालू लागले. जर तुला इतर कोणासह फिरायचं असेल तर बुरखा काढून जात जा असं यावेळी त्यांनी तिला सुनावलं. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यानंतर पोलिसांनी कारवाई केली असून, एका आरोपीला अटक केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'हिंदू मित्र सोडून तुला दुसरं कोणी भेटलं नाही का?', मुस्लिम तरुणीबरोबर गैरवर्तणूक, Video व्हायरल


 


बंगळुरु पोलिसांनी ज्या व्यक्तीला अटक केली आहे, त्याचं नाव झाकिर आहे. यानेच बुरखा घालून निघालेल्या तरुणीला दुचाकीवरुन हिंदू तरुणासह का फिरत आहेस? अशी विचारणा करण्यास सुरुवात केली होती. यामुळे मुस्लीम समाजाची बदनामी होत असल्याचं त्याचं म्हणणं आहे. 



तरुणीशी गैरवर्तन करणाऱ्या तरुणाला अटक


या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. यानंतर बंगळुरु ईस्ट झोनच्या सायबर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी ट्वीट करत दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कर्नाटक सरकारमधील मंत्री प्रियांक खडगे यांना ट्वीट करत कारवाईची मागणी करण्यात आली होती. 



मुस्लीम तरुणीशी गैरवर्तन


व्हायरल झालेल्या व्हिडीओत दिसत आहे की, तरुणी गाडीवरुन उतरल्यानंतर मुस्लीम तरुण तिला तिचं नाव विचारत आहेत. यानंतर तरुणी त्यांना तुम्ही मला हे विचारणारे कोण? असा प्रश्न करते. यानंतर हे तरुण तरुणीवर बुरखा हटवण्यासाठी दबाव टाकतात. जेव्हा वाद वाढू लागतो तेव्हा तरुण तिला वडिलांना फोन लावण्यास सांगतात. तरुणी जेव्हा आपण विवाहित आहोत असं सांगते, तेव्हा ते पतीला फोन करुन येथे बोलावण्यास सांगतात. तू एका हिंदू मुलामुळे पतीला धोका देत आहेस असाही आरोप ते करतात. 


तरुणी यावेळी वारंवार तरुणाने माझ्याकडे उत्तर मागणारे तुम्ही कोण? अशी विचारणा करत असते. तरुणी आपल्या स्कुटीवर जाऊन बसली असता तरुण तिची चावी काढून घेतात आणि तू इस्लामची मुलगी आहे असं म्हणतात. यावेळी तरुणीशी बोलताना अपशब्दही वापरले जात असल्याचं ऐकू येत आहे. 


'हिंदू मित्र सोडून तुला दुसरं कोणी भेटलं नाही का?'


याआधीही अशीच घटना घडली होती. उत्तर प्रदेशमधल्या मुरादाबाद (UP Moradabad) येथे हिंदू मित्राच्या दुचाकीवर बसल्याने  मुस्लिम तरुणीबरोबर (Muslim Girl) गैरवर्तणूक (Misbehavior) करण्यात आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral on Social Media) झाला होता. ही मुलगी आपल्या हिंदू मित्राबरोबर (Hindu Friend) त्याच्या दुचाकीवरुन जात होती. याचवेळी एका मुस्लिम तरुणाने तिचा पाठलाग केला. त्यानंतर तिला रस्त्यात थांबवत हिंदू मित्राबरोबर का फिरतेयस असा तिला जाब विचारला. दरम्यान, या प्रकरणी FIR दाखल करण्यात आला होता. 


या तरुणाने मु्स्लिम तरुणीला थांबवत तिला उलट-सुलट प्रश्न विचारले. तू हिंदू मुलाबरोबर दुचाकीवर का बसलीस? तुला दुसरं कोणी भेटलं नाही का? यावर मुलीने हा आपला मित्र असल्याचं सांगितलं. दुचाकीवर बसलेल्या मुलाने आपण तिच्या संपूर्ण कुटुंबाला ओळखत असल्याचं सांगितलं यानंतरही अडवणूक करणाऱ्या मुलाने त्यांना सोडलं नाही.