Muzaffarnagar Student : उत्तर प्रदेशमधल्या मुझफ्फरनगरमध्ये एका शाळेत विद्यार्थ्याला (Student) मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. या व्हिडिओमुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. वर्ग शिक्षिकेने विद्यार्थ्याला इतर विद्यार्थ्यांकडून मारहाण करायला लावलं. इतकंच नाही तर त्याला आक्षेपार्ह शब्दात टिपणी देखील केली. या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. याचे पडसात आता राजकीय पटलावरही उमटू लागले आहेत. पीडित विद्यार्थ्याने वर्गात नेमकं काय झालं याबाबत माहिती दिली आहे.. तर वर्गशिक्षिकेने  (Class Teacher) आपली बाजूही मांडली आहे. याप्रकरणी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून वर्गशिक्षिकेविरोधात तक्रार दाखल केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय आहे नेमकी घटना?
ही घटना मुझफ्फरनगरमधल्या मंसूरपूर इथल्या खुब्बापूर गावातील आहे. इथल्या एका खासगी शाळेतील वर्ग शिक्षिका तृप्ता त्यागी यांनी एका विद्यार्थ्याला शिक्षा दिली. त्याची चूक फक्त इतकी होती की त्याने पाढे पाठ केले नव्हते. शिक्षा म्हणून त्याला वर्गात उभं करण्यात आलं आणि इतर विद्यार्थ्यांना त्याच्या कानाखाली मारण्यास सांगितलं. 


'मुलांनी मला एका तास मारलं'
पीडित विद्यार्थी या शिक्षेने प्रचंड घाबरला आहे. त्याने वर्गात नेमंक काय घडलं याची माहिती दिली. मी पाढा पाठ केला नव्हता. त्यामुळे वर्गातल्या इतर विद्यार्थ्यांनी मला मारलं. वर्ग शिक्षिकेने त्यांना मारण्यास सांगितलं होतं, असं पीडित विद्यार्थ्याने सांगितलं. वर्गातील मुलांनी मला एक तास मारल्याचंही त्याने म्हटलंय. मुलाचा मावस भाऊ काही कामानिमित्त शाळेत गेला होता, त्यावेळी आपल्या भावाला वर्गातील इतर मुलं एक-एक करुन मारत असल्याचं दिसलं. 


पीडित विद्यार्थ्यााच गाल लाल झाला
अनेक मुलांना पीडित मुलाच्या कानाखाली मारल्याने त्याचा गाल लाल झाला होता. त्यानंतर वर्ग शिक्षिकने मुलांना कमरेवर मारण्यास सांगितलं. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरु केला आहे. 


आरोपी शिक्षिकेने सांगितंल कारण
आरोपी शिक्षिका तृप्ता त्यागी यांनी या घटनेवर स्पष्टीकरण दिलं आहे. दोन महिन्यांपासून सांगूनही मुलगा पाढे पाठ करत नव्हता. त्यामुळे त्याच्या वडीलांनी थोडं कठोर वागण्यास सांगितलं होतं. त्यामुळे विद्यार्थ्याला शिक्षा देण्यासाठी इतर मुलांना मारण्यास सांगितल्याचं आरोपी शिक्षिकने सांगितलं. तसंच हिंदू-मुस्लिम असा भेदभाव करण्याचा आपला हेतू नसल्याचंही तीने सांगितलं आहे. 


घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी शाळेच्या प्रिन्सिपलशी चर्चा केली. व्हायरल व्हिडिओत आरोपी शिक्षिका आक्षेपार्ह वक्तव्य करताना दिसत आहे. या घटनेनंतर पीडित मुलाच्या पालकांनी फिचे पैसे परत घेतले असून मुलाला त्या शाळेत न शिकवण्याचा निर्णय घेतला आहे.