माझा धातू वेगळाच, दोनदा पंतप्रधान होणे पुरेसे नाही : नरेंद्र मोदी
गुजरात सरकारने भरूच येथे `उत्कर्ष समारंभ` ( Utkarsh Samaroh ) आयोजित केला होता. गुजरात सरकारने राज्यात चार प्रमुख योजना राबविल्या.
गांधीनगर : गुजरात सरकारने भरूच येथे 'उत्कर्ष समारंभ' ( Utkarsh Samaroh ) आयोजित केला होता. गुजरात सरकारने राज्यात चार प्रमुख योजना राबविल्या. त्याची 100 टक्के अंमलबजावणी केली. या योजनांमुळे गरीब गरजूंना आर्थिक मदत होणार आहे. याचाच 'उत्कर्ष समारंभ' साजरा करण्यात आला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi ) या सभारंभात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते. गुजरात सरकारच्या योजनेचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी एक किस्सा सांगितला.
काही दिवसांपूर्वी एका नेते मला भेटायला आले होते. राजकारणात त्यांनी अनेकदा आमचा विरोध केला. पण, मी त्यांचा आदर करतो. काही बाबतीत ते माझ्यावर खूश नव्हते. म्हणूनच ते मला भेटायला आले होते.
ते नेते म्हणाले, 'मोदीजी, तुम्ही दोनदा देशाचे पंतप्रधान झाला आहात. आता अजून काय हवंय? कोणी दोनदा पंतप्रधान झाले तर सर्व काही मिळाले,' हे त्यांचे मत होते. मी ते ऐकून घेतले आणि म्हणालो, 'मी वेगळ्या धातूचा आहे.'
'मोदी कोणत्या धातूपासून बनले आहेत हे त्यांना माहीत नाही. गुजरातच्या भूमीने मला घडवलं आहे. कोणतेही काम कमी होत नसते हा माझा विश्वास आहे. जे काम करायचे आहे ते पूर्ण झाले. आता विश्रांती घ्यावी, असे मला कधीच वाटत नाही. लोकहिताच्या योजना 100 टक्के लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत, हे माझे स्वप्न आहे, असे मोदी म्हणाले.
पंतप्रधान मोदी यांनी भाषणादरम्यान कोणत्याही नेत्याचे नाव घेतले नाही. मात्र, काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार त्यांना भेटायला गेले होते. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शरद पवार यांचा आदर करतात. यावरून त्यांचा रोख पवार यांच्याकडेच होता असे मानले जात आहे.