सरकारचे अपयश लपवण्यासाठी नरेंद्र मोदी माझ्यावर आरोप करतात- रॉबर्ट वाड्रा
माझ्यावर मानसिक दबाव आणण्यासाठी सरकारकडून छळ.
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या जाहीर प्रचारसभांमध्ये देशातील गरिबी आणि बेरोजगारी या मुद्द्यांवर बोलायचे सोडून माझ्यावर आरोप करण्यात धन्यता मानत आहेत. प्रचारसभांमध्ये त्यांनी माझ्यावर केलेले आरोप ऐकून मला धक्का बसला आहे. मात्र, या सगळ्यामागे ते स्वत:च्या सरकारचे अपयश लपवण्याचा प्रयत्न करत असल्याचे रॉबर्ट वाड्रा यांनी सांगितले. वाड्रा यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. तसेच मोदी सरकारने गेल्या पाच वर्षांमध्ये माझी छळवणूक केल्याचाही आरोप वाड्रा यांनी केला. विविध सरकारी यंत्रणांकडून, न्यायालयाकडून आणि कर खात्याकडून मला कारण नसतानाही नोटीस पाठवल्या जात आहेत. जेणेकरून माझ्यावर मानसिक दबाव यावा. आतापर्यंत मला सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) ११ वेळा नोटीस बजावण्यात आली. प्रत्येकवेळी माझी ८ ते ११ तास कसून चौकशी करण्यात आली. मात्र, अजूनपर्यंत माझ्यावरील एकही आरोप सिद्ध होऊ शकलेला नाही, असे वाड्रा यांनी म्हटले.
मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी तरीही वारंवार माझ्यावर आरोप करून राजकारण करू पाहत आहेत. जेणेकरून सरकारच्या अपयशावरून लोकांचे लक्ष विचलित होईल. मात्र, मला भारतीय न्यायव्यवस्थेच्या क्षमतेवर पूर्णपणे विश्वास असल्याचे वाड्रा यांनी सांगितले.