बंगळुरू : शुक्रवारी दुपारच्या सुमारास बंगळुरूतील दक्षिण भागामध्ये एका रहस्यमयी आवाजानं सर्वानाच धडकी भरली. एक मोठा आवाज झाला, ज्यामुळं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळालं. या घटनेमुळं मागच्या वर्षी भारतीय वायुदलाच्या एका विमानामुळं झालेल्या आवाजाची आणि त्यानंतर उदभवलेल्या परिस्थितीची आठवण करुन दिली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुत्रांच्या माहितीनुसार हा एक 'सॉनिक बूम' होता का, याबाबतची माहिती मिळवण्यासाठी सध्या यंत्रणा तपासात गुंतली आहे. शुक्रवारी दुपारी जवळपास 12.15 वाजण्याच्या सुमारास एक विचित्र आणि मोठा आवाज झाल्याची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेसह अनेकांनीच ट्विटरच्या माध्यमातून दिली. 


अनेकांनीच लावले तर्क... 


सरजापूर, जेपी नगर, बेन्सन टाऊन, उल्सूर, इसरो लेआऊट, एचएसआर लेआऊट, दक्षिण बंगळुरू आणि पूर्व बंगळुरू या भागांमध्ये हा मोठा आवाज ऐकला गेला. या आवाजामुळं आपल्या घराच्या खिडक्याही हादरल्या, काही ठिकाणी खिडक्या तुटल्या अशीही माहिती प्रत्यक्षदर्शी स्थानिकांनी दिल्याचं म्हटलं जात आहे. 



मागील वर्षी मे महिन्यामध्ये इथं अशाच पद्धतीचे आवाज ऐकू आले होते. काही स्थानिकांना मोठा गडगडाट ऐकू आला होता. तर, काहींना धरणी हादरत असल्याचंही जाणवलं होतं. या आवाजामुळं अनेक चर्चा सुरु झाल्याचं पाहत भारतीय वायुदलानं अतिशय महत्त्वाचा खुलासा केला होता. वायुदलाच्या चाचणी उड्डाणामध्ये सुपरसोनिक प्रोफाइलचाही सहभाग होता. त्याअंतर्गत वायुदलाच्या विमानानं उड्डाण भरलं होतं, ज्यामुळंच (Sonic Boom) झाल्याचं समोर आलं होतं.