Nagaland Election Result: ईशान्येतील राज्यं मेघालय (Meghalaya), नागालँड (Nagaland) आणि त्रिपुरामधील (Tripura) निकालाचं चित्र जवळपास स्पष्ट झालं आहे. नागालँडमधील जनतेने इतिहास रचला आहे. कारण येथे प्रथमच महिला आमदार निवडून आली आहे. तब्बल 60 वर्षानंतर एखादी महिला उमेदवार निवडून आल्याने राज्यासाठी हा ऐतिहासिक क्षण आहे. भाजपाचा सहकारी पक्ष राष्ट्रवादी डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीच्या (एनडीपीपी) उमेदवार हेकानी जाखलू (Hekani Jakhalu) विजयी झाल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हेकानी यांनी दिमापूर-III मतदारसंघातून विजय मिळवला आहे. हेकानी 1536 मतांच्या फरकाने विजय मिळवला आहे. हेकानी यांनी लोकजनशक्तीचे उमेदवार एजेतो झिमोमी यांचा पराभव केला. हेकानी या वकील आणि सामाजिक कार्यकर्त्या आहेत. 


नागालँडमध्ये एकूण चार महिला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होत्या. दरम्यान राज्याला आणखी एक महिला आमदार मिळण्याची शक्यता आहे. हेकानी यांच्याशिवाय एनडीपीपीच्या सलहौतुओनुओ क्रूस सध्या आघाडीवर आहेत. 


Nagaland Election Result: नागालँडमध्ये निळा झेंडा फडकला, आठवले गटाने रचला इतिहास


 


नागालँडमध्ये आतापर्यंत 14 वेळा विधानसभा निवडणुका पार पडल्या आहेत. पण याआधी एकदाही महिला उमेदवार निवडून आलेली नाही. यावेळी निवडणुकीच्या रिंगणात एकूण 183 उमेदवार होते. यामध्ये चार महिला उमेदवारांचा समावेश होता. हेकानी जखालू, क्रूस यांच्याशिवाय काँग्रेसच्या रोजी थॉम्पसन आणि अटोइजू मतदारसंघातून भाजपाच्या काहुल सेमाही मैदानात आहेत. 



नागालँडमध्ये भाजपा-एनडीपीपी युती पुन्हा एकदा सत्तेत येणार असल्याचं जवळपास स्पष्ट झालं आहे. भाजपा-एनडीपीपीचे उमेदवार एकूण 35 जागांवर आघाडीवर आहेत. नागालँडमध्ये भाजपा आणि नॅशनल डेमोक्रॅटिक प्रोगेसिव्ह पार्टी (NDPP) यांची युती असून सर्व 60 जागा लढत आहेत. जागावाटपानुसार भाजपाने 60 पैकी 20 जागांवर तर उर्वरित 40 जागांवर एनडीपीपीने निवडणूक लढली आहे.