लोखंडी स्लायडिंग गेट पडून चिमुकलीचा मृत्यू
लाडक्या निहारिकाच्या मृत्यने माहुले कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
अमर काणे, झी मीडिया, नागपूर : नागपुरात लोखंडी गेट अंगावर पडून एका दीड वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. निहारिका माहुले असे मयत चिमुकलीचे नाव आहे. लोखंडी स्लायडिंग गेट ड्रॅग करून बंद करत असताना गेट पडल्यामुळे ही दुर्घटना घडली. रवी-निकिता माहुले यांची निहारिका एकुलती एक लेक होती. हुडकेश्वर चक्रपाणीनगर येथे हेडाऊ यांच्या घरी भाड्याने राहणाऱ्या माहुले कुटुंबासोबत बुधवारी रात्री मात्र अघटीत घडले.
निहारिकाचा काका पंकज रात्री घरी पोहचला. पंकज गेटमधून मोटरसायकल घरात घेत होता.. तेवढ्यात नेहारिकानेही काकाला भेटण्यासाठी धाव घेतली. दरम्यान काका पंकजने स्लायडिंग गेट बंद करत असताना ते स्लायडिंग गेट निहारिकाच्या अंगावर पडले. पंकजने आरडाओरड केली.त्यानंतर घरातील इतर मंडळी धावत आले. त्यांनी ते गेट हटविले. मात्र या दुर्घटनेत निहारिका गंभीर जखमी झाली होती. तिला खाजगी रुग्णालयात उपाचारासाठी नेले मात्र उपचारादरम्यान तिचा गुरुवारी मृत्यू झाला.
लाडक्या निहारिकाच्या मृत्यने माहुले कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. काका पंकज तर या घटनेनंतर सुन्नच झाला आहे. निहारीकाच्या मृत्यूमुळे माहुले कुटुंब पूर्णपणे हादरले असून ते बोलण्याच्याही मनस्थित नसल्याचे पंकज माहुले यांचे मित्र अविनाश गुजर यांनी सांगितले. या घटनेमुळे लहानगे घरी असताना प्रत्येक ठिकाणी काळजी घेण्याची गरज असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.