Motihari News: देशाच्या कानाकोपऱ्यात काही ना काही अजब गजब घटना समोर येत असतात. काही दिवसांपुर्वी विद्यार्थ्याच्या पोटातून केसांचा गुच्छा बाहेर काढल्याची घटना समोर आली होती. असे अनेक प्रकार याआधीदेखील समोर आले आहेत. पण बिहारच्या चिंपारण जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. येथे एका तरुणाच्या पोटातून चाव्यांचा गुच्छा, नेल कटर, चाकूसह अनेक धातूच्या वस्तू काढण्यात आल्या. पूर्व चंपारणच्या जिल्हा मुख्यालयातील मोतिहारीमधील खासगी रुग्णालयात हे ऑपरेशन करण्यात आले. यावेळी ऑपरेशन करणाऱ्या डॉक्टरांना या वस्तू पाहून गरगरायला झालं. काय आहे हा प्रकार? सविस्तर जाणून घेऊया.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोतिहार येथील खासगी रुग्णालयात एका 22 वर्षीय तरुणाला काही दिवसांपुर्वी दाखल करण्यात आले होते. पोटात खूप दुखत असल्याची तक्रार त्याच्याकडून वारंवार करण्यात येत होती. काहीतरी सर्वसाधारण आजार समजून आधी कोणी हा प्रकार फारसा गांभीर्याने घेतला नव्हता. पण नंतर जे समोर आले ते पाहून सर्वांची झोप उडाली. 


एक्सरे रिपोर्टमध्ये दिसल्या धातुसदृश्य वस्तू 


22 वर्षीय तरुणाच्या पोटातून  नेल कटर, चाकू, चाव्यांचा गुच्छा आणि इतर धातुच्या वस्तू काढण्यात आल्या. तरुणाचे ऑपरेशन करणाऱ्या डॉक्टरांच्या टीमचे प्रमुख डॉक्टर अमित कुमार यांनी पत्रकारांना यासंदर्भात माहिती दिली. या तरुणावर मानसिक उपचार सुरु आहेत. त्याने काही दिवसांपुर्वी आपल्या परिवाराकडे पोटात खूप दुखत असल्याची तक्रार केली. यानंतर त्याच्या पोटाचा एक्सरे काढण्यात आला. यात धातूसदृश्य वस्तू दिसल्या. म्हणून त्याचे ऑपरेशन करण्याचा निर्णय घेण्यात आला. सुरुवातीला त्याची सर्जरी केल्यानंतर आम्ही चावीचा गुच्छा बाहेर काढला., अशी माहिती डॉक्टरांनी दिली. 


चाकू, नेल कटर आणि बरंच काही...


आम्ही तात्काळ त्या तरुणाची सर्जरी करण्याचा निर्णय घेतला. कारण एक्सरेमध्ये त्याच्या पोटात धातूच्या वस्तू असल्याचे दिसत होते. अशामुळे त्याच्या जीवाला धोका होता. आम्ही त्याच्या पोटातून 2 वेगवेगळ्या चाव्या, एक चार इंचाचा चाकू आणि 2 नेल कटर बाहेर काढल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. 


डॉक्टरांना धक्का देणारी घटना 


आमच्यासाठी ही धक्का देणारी सर्जरी होती. पोटात जोराने दुखत असल्याची तक्रार करणाऱ्या त्या तरुणाची आम्ही विचारपूस केली. यावेळी आपण गेल्या काही दिवसांपासून धातूच्या वस्तू खात असल्याचे त्याने सांगितले. आता या तरुणाची तब्येत ठिक आहे. पुढच्या 2-3 दिवसात त्याच्या आरोग्यात सुधारणा होईल, असे डॉक्टरांनी सांगितले. तसेच तरुणाला मानसिक आजार असून त्यासंदर्भाती औषधोपचार देण्यात आल्याचे डॉक्टरांनी सांगितले. 


जोखमीची सर्जरी 


ही सर्जरी अत्यंत जोखमीची होती. सर्वसाधारणपणे लहान मुलांकडून अशा तक्रारी येतात. या तरुणाला लवकरच रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येईल, असे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान तरुणाच्या नातेवाईकांनी यावर कोणते भाष्य केले नाही.