वाद विसरून पटोलेंनी घेतली `राष्ट्रवादी`ला निवडून आणण्याची जबाबदारी
त्यामुळे पटोले आणि पटेल यांच्यातली सुंदोपसुंदी संपल्याचीही चिन्हं दिसत आहेत.
नवी दिल्ली : भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीकडूनच उमेदवार उभा केला जाईल, हे आता स्पष्ट झालंय. आपापसातला वाद विसरून ही जागा जिंकण्याचा चंगच राष्ट्रवादीनं बांधलाय. राष्ट्रवादीला निवडून आणण्याची जबाबदारी माझी, असं म्हणत काँग्रेस नेते नाना पटोले यांनी ही जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतलीय. दिल्लीत राहुल गांधींसोबत झालेल्या बैठकीनंतर पटोलेंनी हे विधान केलंय.
पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी घेतलेला निर्णय आपल्याला मान्य आहे... ही जागा राष्ट्रवादीच लढवणार आणि राष्ट्रवादीचाच उमेदवार निवडून येणार... त्यांना निवडून आणण्यीच जबाबदारी माझी असं नाना पटोले यांनी म्हटलंय. त्यामुळे पटोले आणि पटेल यांच्यातली सुंदोपसुंदी संपल्याचीही चिन्हं दिसत आहेत.
'ही जागा राष्ट्रवादीच लढवणार'
भंडारा गोंदिया पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचाच उमेदवार असेल, अशी माहिती घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी केलीय. काँग्रेसचे नेते नाना पटोले यांच्याशी असलेले सगळे मतभेद संपल्याचंही पटेल यांनी म्हटलंय. नाना पटोले हे आपल्याला लहान भावासारखे आहेत आणि आगामी काळात सोबत मिळून काम करु, असंही प्रफुल्ल पटेल यांनी याआधी सांगितलं होतं. राष्ट्रवादीच्या उमेदवाराची घोषणा ९ मे रोजी करेल, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.
दरम्यान राहुल गांधी आणि शरद पवार यांची दिलीत बैठक झाली आहे. राज्यात होऊ घातलेल्या लोकसभा आणि विधानसभेची पोटनिवडणूक कॉग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र लढणार असल्याची माहिती पटेल यांनी दिली.
२८ मे रोजी मतदान
पंतप्रधान मोदी आणि भाजपच्या कार्यपद्धतीवर टीका करत नाना पटोलेंनी १२ डिसेंबर २०१७ ला आपल्या गोंदिया-भंडारा लोकसभा मतदारसंघाच्या खासदारकीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पालघर, भंडारा गोंदिया या मतदारसंघात २८ मे रोजी पोटनिवडणूक होणार आहे.