नवी दिल्ली : काँग्रेसला रामराम केल्यानंतर नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाची जोरदार चर्चा सुरु झाली. अखेर काल नारायण राणे दिल्लीत पोहोचले. मात्र, भाजप दरबारी  राणेंच्या भाजपप्रवेशाची चर्चा निष्फळ ठरली. राणेंचा भाजपप्रवेश पुन्हा लटकलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्र राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीनंतरच फैसला होण्याची शक्यता आहे. दरम्यान, राणे अमित शाहांना हॉस्पिटलच्या उद्घाटनाचं निमंत्रण द्यायला आले, असा भाजप प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी लंगडा युक्तीवाद केला.


नारायण राणेंच्या भाजपमधील प्रवेशाबाबत पक्षश्रेष्ठींनी वेट अॅण्ड वॉचची भूमिका घेतलीये, असं चित्र दिसतंय.  नारायण राणेंनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची भेट घेतली. यावेळी राणेंच्या पक्ष प्रवेशाबद्दल अमित शाह यांनी स्वत: हून विषय काढला नाही. राणे यांनी काँग्रेस मध्ये मिळालेली वागणूक बोलून दाखविली. आपली व्यथा मांडली, अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय.


 बैठकीनंतर अमित शाह आणि नारायण राणे दोघंही मुंबईला रवाना झाले. ग्रामपंचायत निवडणुकीनंतर राणेंच्या प्रवेशावर निर्णय होण्याची शक्यता आहे.  म्हणजेच दिवाळीनंतरच राणेंबाबत निर्णय होणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपने पुन्हा एकदा राणेंना टोलवल्याची चर्चा आहे.