मोदींनी ढीगभर आश्वासने दिली, पण जनमत वाया घालवले- मनमोहन सिंग
साडेचार वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी दिलेल्या आश्वासनांवरून मतदारांचा विश्वासही उडाला आहे,
नवी दिल्ली: नरेंद्र मोदी यांचा पंतप्रधानपदाचा कार्यकाळ हा अनेक विरोधाभासात्मक कृतींनी भरलेला आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत मिळालेले जनमत त्यांनी वाया घालवले. मोदी सरकारच्या साडेचार वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी दिलेल्या आश्वासनांवरून मतदारांचा विश्वासही उडाला आहे, अशी टीका माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केली.
ते शुक्रवारी दिल्लीत शशी थरूर लिखित 'पॅराडॉक्सिअल प्राइम मिनिस्टर' या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, मोदींनी संपूर्ण देशाचा पंतप्रधान म्हणून शपथ घेतली होती. मात्र, जातीय हिंसा, मॉब लिचिंग आणि गोरक्षकांचा उच्छाद अशा घटनांवर त्यांचे सरकार नेहमीच शांत राहिले.
भेदरलेली जनता, अविचारी निर्णयांमुळे अर्थव्यवस्थेचे झालेले नुकसान, रोजगारांची कमतरता, शेतकऱ्यांमध्ये वाढत असलेला अविश्वास, शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या, सीमारेषेवरील असुरक्षित वातावरण, काश्मीरमधील अस्थिरता आणि मोठा गाजावाजा करून सुरु करण्यात आलेल्या सरकारी योजनांचे अपयश ही मोदींच्या पंतप्रधानपदाच्या कारकीर्दीची व्यवच्छेदक लक्षणे राहिली आहेत. त्यांच्या काळात देशात निधर्मीवाद, विविधता, स्वातंत्र्य, गेल्या अनेक दशकांपासून भारतीय समाजात अबाधित असलेली समानता या कशालाही थारा नसल्याची टीकाही यावेळी मनमोहन सिंग यांनी केली.