पुलवामा हल्ला म्हणजे मोदी आणि इम्रान खान यांची मॅचफिक्सिंग; काँग्रेस नेत्याची मुक्ताफळे
हरिप्रसाद यांच्या सेल्फ गोलमुळे काँग्रेस अडचणीत येण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली: पुलवामातील दहशतवादी हल्ला हा नरेंद्र मोदी आणि इम्रान खान यांच्यातील मॅचफिक्सिंग असल्याचे वादग्रस्त विधान काँग्रेसचे राज्यसभा खासदार बी.के. हरिप्रसाद यांनी केले आहे. पुलवामा हल्ल्यानंतरच्या घटनाक्रमाकडे तुम्ही बारकाईने पाहाल तर ध्यानात येईल की, हा हल्ला म्हणजे मोदी आणि इम्रान खान यांच्यातील मॅचफिक्सिंग होती. अन्यथा पुलवामातील हल्ला झालाच नसता, असे हरिप्रसाद यांनी म्हटले. पुलावामा हल्ल्यानंतर काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांनी आम्ही सरकारच्या पाठिशी ठामपणे उभे असल्याचे सांगत सामंजस्याची भूमिका घेतली होती. मात्र, आता हरिप्रसाद यांच्या सेल्फ गोलमुळे काँग्रेस अडचणीत येण्याची शक्यता आहे.
यापूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी पुलवामा हल्ल्यासंदर्भात केलेल्या एका ट्विटवरूनही वाद निर्माण झाला होता. या ट्विटमध्ये दिग्विजय सिंह यांनी पुलवामा हल्ल्याचा उल्लेख दुर्घटना असा केला होता. यावरुन भाजपच्या नेत्यांनी काँग्रेसवर सडकून टीकाही केली होती. त्यामुळे आता बी.के. हरिप्रसाद यांच्या विधानाने भाजपच्या हातात आयते कोलीत मिळाले आहे. भाजपकडून त्यांच्यावर टीकाही सुरु झाली आहे. हरिप्रसाद यांचे हे वक्तव्य अतिशय बेजबाबदार आहे. अशी विधाने करताना हरीप्रसाद यांना लाज वाटायला हवी. असे काही बोलण्याआधी त्यांनी आपली बुद्धी कुठे गहाण टाकली, अशी टीका कर्नाटकमधील भाजप नेते रवीकुमार यांनी केली.
१४ फेब्रुवारी पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवाद्यांकडून आत्मघातकी हल्ला करण्यात आला होता. यामध्ये सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले होते. जैश-ए-मोहम्मद या संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. यानंतर भारतात संतापाचे वातावरण तयार झाले होते. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय वायूदलाने एअर स्ट्राईक करत पाकव्याप्त काश्मीरमधील जैश-ए-मोहम्मदचा प्रशिक्षण तळ उद्ध्वस्त केला होता.