`हे` बडे नेते देखील करतात नवरात्रीचा उपवास !
आजपासून नवरात्र उत्सवाला प्रारंभ होत आहे. या मंगल उत्सवाच्या कालावधीत अनेकजण उपवास करतात.
मुंबई : आजपासून नवरात्र उत्सवाला प्रारंभ होत आहे. या मंगल उत्सवाच्या कालावधीत अनेकजण उपवास करतात. पण विशेष म्हणजे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हेदेखील देवीच्या उपासनेसाठी नऊ दिवस उपवास करणार आहेत. आजपासून सुरू होणारा नवरात्रोत्सव २९ सप्टेंबरला संपेल, त्यानंतर दहाव्या दिवशी दसऱ्याचा सण साजरा केला जाईल.
नरेंद्र मोदी हे थोडे थोडके नव्हे तर गेल्या २८ वर्षांपासून नवरात्रीचे उपवास करतात. या उपवासात ते फक्त पाणीच पितात. इतके कडक उपवास असूनही ते कामाचा व्याप कसा सांभाळतात, असा प्रश्न साहजिकच अनेकांना पडतो. मात्र, मोदी गेल्या अनेक वर्षांपासून अशाप्रकारे उपवास करत असल्यामुळे त्यांना विशेष त्रास जाणवत नाही.
तसेच दसऱ्याच्या दिवशी ते शस्त्रांची पूजाही करतात. २००१ ते २०१४ या काळात गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी असताना मोदी नेहमी आपल्या सुरक्षा रक्षकांसोबत शस्त्रांची पूजा करायचे. याशिवाय, गोरखपूर येथील मठाचे अधिपती असणारे योगी आदित्यनाथही नवरात्रीत उपवास करतात. आज ते गोरखनाथ मंदिरात घटाची स्थापना करतील.