नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी भूतान दौऱ्यासाठी रवाना होणार आहेत. भूतानचे पंतप्रधान डॉ. लोटे शेरिंग यांनी मोदींना भूतानमध्ये येण्याचे आमंत्रण दिले होते. त्यांची ही विनंती मान्य करून पंतप्रधान भूतान दौऱ्यावर जात असल्याचे परराष्ट्र मंत्रालायकडून सांगण्यात आले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोदींचा हा भूतानचा दुसरा अधिकृत दौरा असेल. यापूर्वी २०१४ साली  पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर मोदी पहिल्यांदा भूतानमध्येच गेले होते. त्यामुळे मोदींच्या या पुनर्भेटीला विशेष महत्त्व आहे. 


मोदींच्या या दोन दिवसीय दौऱ्यात द्विपक्षीय संबंध सुधारणे आणि नेबरहुड पॉलिसीवर चर्चा होईल. तसेच या दौऱ्यादरम्यान नरेंद्र मोदी रुपी कार्ड लॉन्च करणार असल्याची माहिती परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी दिली.


दौऱ्यात भूतानचा राजा नरेश जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक आणि भूटानचा चौथा राजा नरेश जिग्मे सिग्ये वांगचुक यांचीही भेट घेणार आहेत. याशिवाय, ते भूतान रॉयल विद्यापीठातील विद्यार्थ्यांशीही संवाद साधतील. 


गेल्याच महिन्यात परराष्ट्र मंत्री एस जयशंकरनं भूतानचा दोन दिवसीय अधिकृत दौरा केला होता. परराष्ट्र मंत्रालयाचा कार्यभार स्विकारल्यानंतर जयशंकर यांचा हा पहिला परराष्ट्र दौरा होता.


दरम्यान, भूतानचे पंतप्रधान लोताय त्शेरिंग यांनी नुकतीच मोदींची प्रशंसा केली होती. मोदींच्या या भेटीमुळे दोन्ही देशांमध्ये मैत्रीचा नवा अध्याय सुरु होणार असल्याचे त्यांनी सांगितले.