Narendra Modi Post After Election Result : देशात झालेल्या लोकसभा निवडणुकीचे (Loksabha Election) निकाल आता हाती येत आहेत. लोकसभा निवडणुकीत एनडीए आणि इंडिया आघाडीमध्ये काँटे की टक्कर पहायला मिळाली आहे. एनडीए 296 तर इंडिया आघाडी 229 जागांवर आघाडीवर आहे. भाजपने यंदाच्या निवडणुकीत 400 पारचा नारा लगावला होता. मात्र, भाजपला अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आली नाही. त्यामुळे आता एनडीएच्या सर्व विजयी खासदारांना दिल्लीत बोलावल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अशातच आता लोकसभा निवडणूक निकालानंतर नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) पहिली प्रतिक्रिया दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय म्हणाले Narendra Modi ?


जनतेने सलग तिसऱ्यांदा एनडीएवर विश्वास दाखवला आहे. भारताच्या इतिहासातील ही एक ऐतिहासिक कामगिरी आहे, असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. या आपुलकीसाठी मी जनता जनार्दन यांना प्रणाम करतो आणि जनतेच्या आशा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी गेल्या दशकभरात केलेले चांगले काम आम्ही सुरूच ठेवू अशी ग्वाही देतो, असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.


मी आमच्या सर्व कार्यकर्त्यांना त्यांच्या मेहनतीसाठी सलाम करतो. मी देशवासियांना खात्री देतो की त्यांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही नवीन ऊर्जा, नवीन उत्साह आणि नवीन संकल्प घेऊन पुढे जाऊ. मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो आणि सर्व कार्यकर्त्यांनी केलेल्या समर्पण आणि अथक परिश्रमाबद्दल त्यांचे अभिनंदन करतो, असंही नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.



दरम्यान, राहुल गांधी यांनी निवडणूक निकालानंतर आनंद व्यक्त केला आहे. भारतातील जनतेनं संविधानासाठी एकत्र येऊन लढावं आणि मला विश्वासही होता. मी जनतेचा, इंडिया आघाडीतील मित्रपक्षांचा, नेता आणि कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानतो. तुम्ही संविधानाला सुरक्षित ठेवण्यासाठी पहिलं आणि सर्वात मोठं पाऊल उचललं आहे. काँग्रेसनं इंडिया आघाडीनं अतिशय स्पष्टपणे देशाला एक नवा दृष्टीकोन दिला आहे, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.