नवी दिल्ली: भारतीय वायूदलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान पाकिस्तानच्या कैदेत असताना विरोधकांनी राजकारण करण्याचा गलिच्छ डाव आखला होता, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. ते ‘रिपब्लिक टीव्ही’या इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, अभिनंद वर्धमान पाकिस्तानच्या तावडीत सापडणे ही खूपच दुर्दैवी गोष्ट होती. मात्र, यानंतर विरोधकांनी बालाकोट एअर स्ट्राईक आणि अभिनंदन यांच्या सुटकेवरून अनेक प्रश्न उपस्थित करायला सुरुवात केली. एवढेच नव्हे तर यापुढे जात विरोधकांनी राजकारण करण्याचा गलिच्छ डाव आखला होता. अभिनंदनची सुटका झाली नसती तर विरोधक कँडल मार्च काढणार होते. मात्र, त्याच दिवशी संध्याकाळी पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी अभिनंदनच्या सुटकेची घोषणा केली. त्यामुळे विरोधकांचा डाव फसला, असा गौप्यस्फोट मोदी यांनी केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मी जेव्हा विकासाच्या मुद्द्यावर बोलतो तेव्हा विरोधक विषय भरकटवण्याचा प्रयत्न करतात. खरंतर आम्ही गॅस कनेक्शन, घरांची निर्मिती आणि सरकारकडून उघडण्यात आलेली बँक खाती अशा विषयांवर चर्चा करायला पाहिजे. आम्ही २४ तास सदैव या विषयांवर बोलायला तयार असतो. मात्र, विरोधक तेच तेच मुद्दे चघळत बसतात आणि मूळ विषयाला बगल देतात, असा आरोपही मोदी यांनी केला. 



कपड्यांचे २५० जोड असलेली व्यक्ती हवी की, २५० कोटी चोरणारी व्यक्ती हवी


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे कपड्यांचे तब्बल २५० जोड असल्याची खोचक टीका अनेकदा विरोधकांकडून केली जाते. या टीकेचा मोदींनी मुलाखतीदरम्यान समाचार घेतला. विरोधकांचे हे आरोप खोटे असतील तरी मला या टीकेचा स्वीकार केला पाहिजे. मात्र, मी असे ऐकले आहे की, तुमच्या नातेवाईकांच्या खात्यात २५० कोटी आहेत. त्यामुळे आता लोकांनीच तुम्हाला २५० कपड्यांचे जोड असलेली व्यक्ती हवी की २५० कोटी रूपये असलेली व्यक्ती हवी, हे ठरवावे, असे मोदींनी सांगितले. 


पाकिस्तानने दहशतवादाचा मार्ग सोडावा
पाकिस्तानने दहशतवादाचा मार्ग सोडावा अशी भारताची मागणी आहे. इंटरपोलकडून रेड कॉर्नर नोटीस जारी झालेल्या दहशतवाद्यांना पाकिस्तानने भारताच्या ताब्यात द्यावे. तसेच २६\११ च्या दहशतवादी हल्ल्यातील दोषींनाही पाकिस्तानने भारताच्या ताब्यात द्यावे.


९ कोटी शौचालयं, सव्वा कोटी घरं अंबानी-अदानींसाठी बांधली नाहीत
मोदी सरकार केवळ अदानी-अंबानी यांच्यासारख्या उद्योगपतींसाठी काम करते, अशी टीका होते. मात्र, आम्ही अडीच कोटी लोकांपर्यंत वीज पोहोचवली. देशात ९ कोटी शौचालये, सव्वा कोटी घरे अंबानी-अदानींसाठी बांधली नाहीत, असे मोदींनी सांगितले.


गांधी कुटुंबीय पुन्हा कधीच सत्तेवर येणार नाही: नरेंद्र मोदी
एकाच कुटुंबातील चार पिढ्यांनी गरिबीवर चर्चा करण्यात वेळ वाया घालवला. या लोकांनी ५५ वर्षे देशावर राज्य केले. आज तेच लोक पुन्हा गरिबीवर बोलत आहेत. त्यांनी आता गरिबांसाठीची योजना जाहीर केली आहे. त्यांचे सरकार येणार नाही, हे त्यांना माहीत आहे. त्यामुळेच ते असे बोलत आहेत. किंबहुना गांधी कुटुंबीय पुन्हा कधीच सत्तेवर येणार नाही.


माझ्या देशप्रेमावर कोणी शंका घेऊ शकत नाही
यापूर्वी जनता मोदीला ओळखत नव्हती. मात्र आता देश मोदीला ओळखतो. राष्ट्रीय सुरक्षेसारख्या प्रश्नांवर देशाला माझी भूमिका माहिती आहे. त्यामुळे देशातील कुठलीही व्यक्ती माझ्या देशभक्तीवर शंका घेत नाही. हे केवळ मी बोलत नाही, तर माझा जीवनप्रवास हे सिद्ध करण्यासाठी पुरेसा आहे, असे मोदींनी सांगितले.