चंदीगढ: नरेंद्र मोदी हे अंबानी-अदानींचे लाऊडस्पीकर असल्याची खरमरीत टीका काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली. ते सोमवारी हरियाणातील प्रचारसभेत बोलत होते. यावेळी राहुल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले. त्यांनी म्हटले की, मोदी दिवसभर अदानी आणि अंबानी यांच्याविषयीच बोलत असतात. नोटाबंदीच्या निर्णयानंतर सर्वसामान्य बँकांसमोर रांगेत उभे होते. त्या रांगांमध्ये अंबानी किंवा अदानींना तुम्ही पाहिलं का? तुम्ही देशाच्या अर्थव्यवस्थेची सध्याची स्थिती पाहताय. आणखी सहा महिन्यांनी देशात मोठ्याप्रमाणावर बेरोजगारी पाहायला मिळेल, अशी भीती यावेळी राहुल गांधी यांनी व्यक्त केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी राहुल यांनी हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्यावरही निशाणा साधला. खट्टर यांच्या भाषणात केवळ खोटी आश्वासने ऐकायला मिळतात. हरयाणात किती लोकांना रोजगार मिळाला? टाटांची फॅक्टरी का बंद पडली?, असे सवाल राहुल यांनी उपस्थित केले. 


मोदी बेरोजगार तरुणांना चंद्र दाखवतायत - राहुल गांधी


तरुणांना मूर्ख बनवण्याचे काम सरकारकडून सुरू आहे. तसे करून फार काळ सरकार चालवता येऊ शकत नाही. तुम्ही सहा महिने किंवा एक वर्ष सरकार चालवू शकता. पण एक दिवस सत्य समोर येईलच. त्यानंतर देशात आणि नरेंद्र मोदींचं काय होतं ते तुम्ही पाहाल, असेही राहुल यांनी म्हटले.