`मोदी स्वत: महालात राहतात, आईला मात्र दहा बाय दहाच्या खोलीत ठेवलेय`
नरेंद्र मोदी आपल्या आईची व्यवस्थित देखभाल करत नाही.
नवी दिल्ली: आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देशभरातील राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. यामध्ये आता राजकीय नेत्यांकडून एकमेकांवर चिखलफेक सुरु आहेत. काँग्रेसचे नेते राशिद अल्वी यांनी नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासंदर्भात वादग्रस्त टिप्पणी केली. राशिद अल्वी यांनी म्हटले की, नरेंद्र मोदी आपल्या आईची व्यवस्थित देखभाल करत नाही. ते स्वत: महालात राहतात, लाखोंचे सूट घालतात. मात्र, आईला दहा बाय दहाच्या खोलीत ठेवलेय. यामुळे त्यांनी तरुणांसमोर चुकीचा आदर्श निर्माण केल्याची टीका राशिद अल्वी यांनी केली. राशिद अल्वी यांच्या या वक्तव्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
तसेच नरेंद्र मोदी २०१९ मध्ये पुन्हा सत्तेत आले तर देशातील लोकशाही संपेल. नागरिकांचे बोलण्याचे स्वातंत्र्य हिरावून घेतले जाईल. त्यामुळे माझ्यासारख्या नेत्यांना साधे भाषणही देणे मुश्किल होईल, असेही अल्वी यांनी म्हटले. भाजपचे नेते चिथावणीखोर भाषणे करत असल्याचा आरोप अल्वी यांनी केला. उत्तर प्रदेशातील आजपर्यंतचे राजकारण पाहता आगामी काळात प्रचाराची पातळी आणखी खालावण्याची शक्यता आहे.
'भाजपामध्ये ज्येष्ठ नेत्यांना बाजूला केलं जातंय' भाजपाला घरचा आहेर
यापूर्वी अल्वी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासंदर्भातही वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांनी योगींची तुलना विषारी सापाशी केली होती. योगी आदित्यनाथ केवळ विषारी गरळ ओकू शकतात. जंगलातील विषारी सापही योगी आदित्यनाथ यांना बघून रस्ता बदलतात, अशी टीका अल्वी यांनी केली होती.
'प्रियंकांना राजकारण समजत नाही, फक्त सुंदर चेहऱ्यामुळे मतं मिळणार नाहीत'