निवडणुकीतल्या विजयानंतर नरेंद्र मोदी आईच्या भेटीला
लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या आईची भेट घेतली.
गांधीनगर : लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या आईची भेट घेतली. निवडणुकीतल्या विजयानंतर मोदींनी गांधीनगरला त्यांच्या घरी जाऊन आईचे आशिर्वाद घेतले. पंतप्रधानपदी निवडून आल्यानंतर नरेंद्र मोदी आज प्रथमच गुजरातमध्ये गेले. अहमदाबाद विमानतळावर मुख्यमंत्री विजय रुपाणी, उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांच्यासह काही मंत्री आणि अधिकाऱ्यांनी अत्यंत साधेपणानं त्यांचं स्वागत केलं.
विमानतळाजवळ असलेल्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर त्यांचं सभास्थानी आगमन झालं. यात सर्वप्रथम त्यांनी सुरतमधल्या अग्निकांडात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करून अशा घटना टाळण्यासाठी योग्य उपाय योजण्याबाबत राज्य सरकारला आदेश दिल्याचं पंतप्रधान म्हणाले. त्यानंतर भाजपावर पुन्हा एकदा दाखवलेल्या विश्वासाबद्दल त्यांनी गुजरातच्या जनतेचे आभार मानले.
नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीची तारीख ठरली आहे. ३० मे रोजी संध्याकाळी ७ वाजता नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेतील. राष्ट्रपती भवनामध्ये हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाची शपथ देतील.