राष्ट्रपतींना भेटून नरेंद्र मोदींचा सत्ता स्थापनेचा दावा
नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना भेटून सत्ता स्थापनेचा दावा केला आहे.
नवी दिल्ली : नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना भेटून सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. नरेंद्र मोदी यांच्यासोबत एनडीएचे सगळे प्रमुख नेते यांनी राष्ट्रपती भवनात जाऊन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. ३० मे रोजी नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. त्याआधी मोदी त्यांचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीमध्ये जाणार आहेत. नरेंद्र मोदींच्या शपथविधीला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे राष्ट्रपती शि जिनपिंग यांना निमंत्रण पाठवण्याची शक्यता आहे.
पुढच्या काळात क्षणाचीही विश्रांती न घेता अविरत काम करत राहणार, असं मोदींनी राष्ट्रपती भवनातून बाहेर पडल्यानंतर सांगितलं. पंतप्रधानांचा शपथविधी आणि मग मंत्रिमंडळाच्या शपथविधीच्या तारखांबद्दल राष्ट्रपतींना लवकरच कळवलं जाईल, असं मोदी म्हणाले.
राष्ट्रपतींकडे सत्ता स्थापनचे दावा करायला जायच्या आधी एनडीएच्या बैठकीत नरेंद्र मोदींची एनडीएच्या संसदीय नेतेपदी निवड करण्यात आली. सदीय दलाच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर भाषण करण्याआधी मोदी भारताच्या संविधानासमोर नतमस्तक झाले. यानंतर मोदींनी त्यांच्या भाषणाला सुरुवात केली.
अटल बिहारी वाजपेयी आणि बाळासाहेब ठाकरे हे आमचे दिशादर्शक आहेत, असं मोदी त्यांच्या भाषणात म्हणाले. ही निवडणूक माझ्यासाठी तीर्थयात्रा होती. मोदींमुळे नाही तर जनतेमुळे आपलं अस्तित्व आहे. प्रसिद्धीपासून लांब राहा, असा सल्ला खासदारांनी दिला.
मंत्रिमंडळाच्या चर्चा करणाऱ्यांना टोला
माध्यमांमध्ये सुरु असलेल्या मंत्रिमंडळाच्या बातम्यांवरही मोदींनी निशाणा साधला. मंत्रिमंडळ बनवणारे अनेक मोदी आहेत. मंत्रिमंडळाबाबत अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. भावी मंत्रिमंडळाच्या बातम्यांकडे दुर्लक्ष करा. बातम्यांमुळे मंत्रिपद मिळतही नाही आणि मंत्रिपद जातही नाही, असं मोदी म्हणाले.
व्हीआयपी संस्कृती सोडा
व्हीआयपी संस्कृतीचा जनतेच्या मनात तिरस्कार आहे, त्यामुळे यापासून लांब राहण्याचा सल्लाही मोदींनी नव्या खासदारांना दिला. विमानतळावर सुरक्षा रक्षकांकडून होणाऱ्या तपासणीवेळी खासदारांना अपमानित झाल्यासारखं वाटतं. पण तुम्हीही सामान्य नागरिक आहात, असं मोदी म्हणाले. मंत्र्यांच्या लाल दिवा काढल्यानंतर मोदींनी लाल दिव्याची नशा उतरवली, असा संदेश गेल्याचं मोदींनी सांगितलं.