नवी दिल्ली : एकेकाळी गुजरातचे मुख्यमंत्री असताना मुस्लीम टोपी नाकारणाऱ्या नरेंद्र मोदींनी आज मुस्लीम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्यात. जम्मू काश्मीरमधून अनुच्छेद ३७० हटवल्यानंतर पहिल्यांदाच 'ऑल इंडिया रेडिओ'च्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेला संबोधित केलं. यावेळी, त्यांनी केंद्रशासित प्रदेश हीच काश्मीरची गरज असल्याचं ठासून सांगितलं. जम्मू-काश्मीरची परिस्थिती हळूहळू सामान्य होईल आणि तुमच्या अडचणी कमी होतील, असंही आश्वासन यावेळी नरेंद्र मोदी यांनी जम्मू-काश्मीरच्या नागरिकांना दिलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'ईदचा सण जवळच आहे... ईदसाठी तुम्हा सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा... जम्मू काश्मीरमध्ये ईद साजरी करण्यात जनतेला कोणत्याही त्रासाला सामोरं जावं लागणार नाही, याकडे सरकार लक्ष देतंय. जम्मू-काश्मीरचे जे रहिवासी बाहेर राहतात आणि ईदच्या निमित्तानं घरी जाऊ इच्छितात त्यांनाही सरकारकडून हरसंभव मदत मिळतेय' असं यावेळी पंतप्रधानांनी म्हटलंय.


'नव्या भारतासोबत नव्या जम्मू काश्मीर आणि नव्या लडाखचीही निर्मिती करूया' असा संकल्पही नरेंद्र मोदी यांनी यावेळी व्यक्त केला.


पाहा काय म्हणाले मोदी आपल्या संबोधनात


 


'त्या' प्रसंगाची आठवण


२०११ मध्ये गुजराचे मुख्यमंत्री असताना अहमदाबाद जिल्ह्यातील पीराणा गावात नरेंद्र मोदी उपस्थित झाले होते. यावेळी, मोदींनी एका मौलानांद्वारे भेट करण्यात आलेली मुस्लीम टोपी परिधान करण्यास मंचावरच नकार दिला होता. या कार्यक्रमात इमाम शाही सय्यद यांनी मंचावर नरेंद्र मोदींच्या डोक्यावर मुस्लीम टोपी घालण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, मोदींनी ही टोपी घालण्यास स्पष्ट नकार दिला. यावेळची दृश्यं आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. 


मात्र, पंतप्रधानपदी आरुढ झाल्यानंतर अनेकदा मोदींनी देश-विदेशात मस्जिदला भेट दिल्यात. सप्टेंबर २०१८ मध्ये मध्यप्रदेशच्या इंदोरमध्ये दाऊदी बोहरा समुदायाच्या एका धार्मिक कार्यक्रमात पंतप्रधान मोदी सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी धर्मगुरू सैयदना मुफद्दल सैफुद्दीन यांची भेट घेत दाऊदी बोहरा समुदायाच्या लोकांना संबोधित केलं होतं.


तसंच २०१७ मध्ये भारताच्या भेटीवर आलेल्या जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांना स्वत: मोदी अहमदाबादच्या सीदी मस्जिदमध्ये घेऊन गेले होते.