मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर येत आहेत. मेट्रोचे दोन टप्पे आणि घरकुल योजनेच्या ४१००० कोटी रूपयांच्या प्रकल्पांचं भूमीपूजन ते करणार आहेत. मुंबईत पोहोचल्यावर लगेच एका खासगी वाहिनीच्या कार्यक्रमात पंतप्रधान सहभागी होणार आहेत. त्यानंतर 'टाईमलेस लक्ष्मण' या पुस्तकांचं प्रकाशन राजभवनावर करतील. त्यानंतर पंतप्रधान दुपारी बहुचर्चित कल्याण दौऱ्यावर येणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ठाणे - भिवंडी - कल्याण मेट्रो ५ आणि दहिसर - मिरा भाईंदर मेट्रो ९ या दोन मेट्रो प्रकल्पांचं भूमीपूजन पंतप्रधानांच्या हस्ते होईल. मेट्रो प्रकल्पांसह पंतप्रधानांच्या हस्ते नवी मुंबईतल्या घरकुल योजनेचाही शुभारंभ होईल. 


नवी मुंबईत सिडको १८ हजार कोटी रूपयांचा ८९,७७१ परवडणाऱ्या घरांचा प्रकल्प साकारत आहे. या प्रचंड प्रकल्पाचा शुभारंभ पंतप्रधानांच्या हस्ते होईल.


त्यानंतर पंतप्रधान पुण्यासाठी रवाना होतील. पुण्यात पंतप्रधानांच्या हस्ते हिंजेवाडी- शिवाजीनगर या पीएमआरडीएच्या मेट्रो प्रकल्पाचं भूमीपूजन होणार आहे. 
 
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मेट्रो-५ प्रकल्पाच्या भूमिपूजनासाठी कल्याणच्या फडके मैदानावर येणार असून या कार्यक्रमादरम्यान होणाऱ्या सभेला ३० ते ४० हजार नागरिक, लोकप्रतिनिधी, पक्ष कार्यकर्ते आणि केंद्रीय मंत्री उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधानांच्या मार्गामध्ये वाहतूक कोंडी निर्माण होऊ नये यासाठी वाहतूक पोलिसांनी काही वाहतूक बदल सुचविले आहेत.