नवी दिल्ली : शनिवारी दुपारी भाजपा नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या निधनाची बातमी आली आणि भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनाही धक्का बसला. नुकतंच, भाजपा नेत्या सुषमा स्वराज यांचं हृद्यविकाराच्या तीव्र धक्क्यानं निधन झालं होतं. या दु:खातून सावरत असतानाच अरुण जेटलींच्या निधन झाल्यानं भाजपाच्या नेत्यांनी हळहळ व्यक्त केलीय. पंतप्रधान नरेंद्र मोदींसहीत भाजपाच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनी अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया सोशल मीडिया ट्विटरवरून व्यक्त केल्या आहेत. अरुण जेटली यांचं शनिवारी २४ ऑगस्ट रोजी दुपारी १२.०७ मिनिटांनी निधन झालं. अरुण जेटली यांना ९ ऑगस्टपासून दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मृत्यूसमयी अरुण जेटली ६६ वर्षांचे होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


सध्या परदेश दौऱ्यावर असणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'एक बहुमूल्य मित्र गमावल्याची' प्रतिक्रिया व्यक्त केलीय. तसंच आपण फोनवरून अरुण जेटली यांच्या पत्नी संगीता जेटली आणि मुलगा रोहन जेटली यांच्याशी बोलून शोक व्यक्त केल्याचंही त्यांनी म्हटलंय. 




अरुण जेटली जी एक राजकीय दिग्गज, बौद्धिक आणि कायदेशीर स्वयंप्रकाशी व्यक्तिमत्व होते. एक नेता म्हणून भारतासाठी त्यांनी महत्त्वाचं योगदान दिलं. त्यांच्या निधन खूप दुःखद आहे. आयुष्याने परिपूर्ण, बुद्धीचातुर्य असलेला, करिश्मायी व्यक्ती होते. समाजातील सर्व घटकांना ते आपलेसे वाटत होते. 




अरुण जेटली जी यांच्या निधनानंतर मी एक बहुमूल्य मित्र गमावला आहे. त्यांना जाणून घेण्याची संधी मला अनेक दशकांपासून मिळाली. त्यांची अंतर्दृष्टी आणि सुक्ष्म आकलनशक्ती उल्लेखनीय होती. ते स्वत: सतत आनंदी राहिले आणि इतरांसाठीही त्यांनी आनंदी आठवणी मागे ठेवल्यात. असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.