राजीव गांधींवर नरेंद्र मोदी यांची रॅलीत गंभीर टीका
राजीव गांधी यांच्यावर नरेंद्र मोदी यांनी रॅलीत गंभीर टीका केली.
लखनऊ : लोकसभा निवडणुकीसाठी पाचव्या टप्प्याचा प्रचार संपताना पातळी सोडून टीका होताना दिसत आहे. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातल्या रॅलीत गंभीर टीका केली. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना उद्देशून मोदींनी वाक्य उच्चारले. तुमच्या वडिलांना त्यांचे साथीदार मिस्टर क्लिन म्हणत असले तरी त्यांची ओळख भ्रष्टाचारी नंबर १ अशीच होती अशा शब्दात मोदी यांनी टीकास्त्र सोडले.
आपल्या पक्षाच्या नेत्यांनी आपल्या वडिलांची प्रतिमा मिस्टर क्लीन अशी बनवली होती. मात्र, पाहता पाहता भ्रष्टाचारी नंबर वन अशा रुपात त्यांचा जीवनप्रवास संपला, असी जहरी टीका मोदी यांनी केली. आपल्या भाषणात पंतप्रधानांनी बोफोर्स कथीत गैरव्यवहाराचा उल्लेख करताना हे वक्तव्य केले. काँग्रेस आणि युपीएला केंद्रात कमकुवत सरकार आणण्यात रस आहे अशी टीका त्यांनी केली.
दरम्यान, माझे वडील राजीव गांधी यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या टीकेला राहुल गांधी यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मोदींवर पलटवार करताना राहुल म्हणाले की, आता लढाई संपली आहे, माझ्या वडिलांवर केलेले आरोपही आता तुम्हाला वाचवू शकणार नाहीत. तसेच प्रियंका गांधी वाड्रा यांनीही मोदी यांच्यावर निशाणा साधला. मोदी यांनी स्वच्छ व्यक्तीच्या हौतात्माचा अपमान केला आहे, असे त्या म्हणाल्यात. उत्तर प्रदेशातील एका प्रचार सभेत मोदींनी शनिवारी नाव घेता राजीव गांधी यांच्यावर भ्रष्टाचारी असल्याची टीका केली होती.