`जेट एअरवेज`च्या लिलावासाठी पदच्च्युत अध्यक्षही उत्सुक
रात्री उशिरा पुन्हा एकदा गोयल यांनी आपली दावेदारी सादर केल्यानं आर्थिक जगतात खळबळ
मुंबई : 'जेट एअरवेज'चे पदच्च्युत अध्यक्ष नरेश गोयल यांनी पुन्हा एकदा कंपनीत घुसण्याचे प्रयत्न सुरु ठेवलेत. रात्री उशिरा कंपनीची मालकी मिळवण्यासाठी नरेश गोयल यांनी जेटच्या लिलावात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त करणारं पत्र सादर केल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. 'जेट एअरवेज' सध्या कमालीच्या आर्थिक संकटात सापडली असून विमानं उडवण्यासाठी कंपनीकडे ना इंधन आहे ना पैसे... त्यामुळे कंपनीची सगळी आंतरराष्ट्रीय उड्डाणं कालपासून बंद आहेत.
सध्या 'जेट एअरवेज'ची मालकी सरकारी बँकांनी घेतली असून खासगी गुंतवणूकदारांना कंपनी विकण्यासाठी बोली लावण्याची मुदत आता वाढवण्यात आली आहे. काल रात्री उशिरा नरेश गोयल यांनी आणखी खासगी गुंतवणूकदाराच्या मदतीनं बोली लावण्यास उत्सुक असल्याचं म्हटलंय.
परंतु, 'जेट एअरवेज'मध्ये गुंतवणूक करण्यास तयार आहोत. पण नरेश गोयल आणि त्यांच्या पत्नीनं कंपनीच्या व्यवस्थापनातून बाजूला व्हावं, अशी अट बँका आणि काही परदेशी गुंतवणूकदारांनी घातली. त्यानुसार नरेश गोयल आणि त्यांच्या पत्नी अपर्णा गोयल यांनी व्यवस्थापन मंडळातून राजीनामा दिला होता. रात्री उशिरा पुन्हा एकदा गोयल यांनी आपली दावेदारी सादर केल्यानं आर्थिक जगतात खळबळ उडाली आहे.
दरम्यान जेट एअरवेज विकत घेण्याच्या शर्यतीत गोयल यांना उतरू द्यायचं की नाही? याचा निर्णय अजून झालेला नाही. बँका याबाबत काय निर्णय घेतात, याकडे आर्थिक जगताचं लक्ष आहे.