मेरठ - भारतात जितकी सामाजिक सहिष्णुता आहे, तितकी जगात इतरत्र कुठेच दिसणार नाही. पाहिजे असेल तर सगळं जग फिरून बघून या, असा खोचक टोमणा योगगुरु बाबा रामदेव यांनी ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्धीन शहा यांना लगावला आहे. त्याचबरोबर भारतापेक्षा अजून चांगला देशही नसीरुद्दीन शहा यांना इतर कुठेच मिळणार नाही. पतंजली परिधान शोरुमच्या उदघाटनासाठी बाबा रामदेव मेरठमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशाकडून इतक्या मोठ्या प्रमाणात प्रेम, आदर, सन्मान मिळाल्यावर अचानक काहीजणांना देश असुरक्षित वाटायला लागतो. अशा लोकांना मग गद्दारच म्हटले पाहिजे. नसीरुद्दीन शहा यांनी काही दिवसांपूर्वी बुलंदशहर प्रकरणावरून आपले मत मांडले होते.  एका पोलिस अधिकाऱ्याच्या हत्येपेक्षा गायींच्या हत्येला जास्त महत्त्व दिले जाऊ लागले आहे. विखारी विचारांचा फैलाव झाला असून, त्याला नियंत्रित करणे आता अवघड झाले आहे. कायदा हातात घेण्याची काही जणांना सूटच मिळाली आहे, असे मत नसीरुद्दीन शहा यांनी मांडले होते. त्यांच्या वक्तव्यावरून पुन्हा एकदा परस्परविरोधी विधाने केली जाऊ लागली आहेत. आता बाबा रामदेव यांनी सुद्धा या प्रकरणावर आपले मत मांडले आहे. 


पतंजली परिधान शोरूमच्या देशभरात ५०० शाखा उघडण्यात येणार असून, त्यामाध्यमातून पाच लाख लोकांना रोजगार मिळवून दिला जाईल, असा दावा बाबा रामदेव यांनी केला आहे. देशातील कापड उद्योग सध्या मरणासन्न अवस्थेत आहे. पतंजली परिधानच्या माध्यमातून त्याला नवजीवन देण्यास सुरुवात करण्यात आली आहे, असेही ते म्हणाले.