नवी दिल्ली : काही दिवसांपासून देशभरात सुरु असणाऱ्या उष्णतेच्या लाटेनं अनेकांचीच काहिली होत आहे. असं असतानाच आता आयएमडी, अर्थात हवामान खात्याकडून उष्णतेचा कमी होणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशाच्या उत्तर भागात असणारी उष्णतेची लाट काही प्रमाणात कमी होणार असल्याचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. मे महिन्याच्या अखेरी म्हणजेच २५ मे पासून ३० मे पर्यंतच्या काळात देशाच्या उत्तरेकडील बहुतांश भागात धुळीचं वादळ येण्याची शक्यता असल्याचां सांगण्यात आलं आहे. इतकंच नव्हे, तर या भागांमध्ये मेघगर्जनेसह पर्जन्यमानाचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. 


मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच देशभरात तापमानाचा पारा लक्षणीयरित्या वर गेल्याचं पाहायला मिळालं. दिल्ली, राजस्थान, हरियाणा, पंजाब आणि उत्तर प्रदेशातील काही भागांमध्ये तापमानाने ४५ अंश सेल्शिअसचा आकडा ओलांडला. याच धर्तीवर आयएमडीकडून २५ आणि २६ मे या दिवसांसाठी उत्तर भारतातील बहुतांश भागांमध्ये रेड कोड अलर्ट म्हणजेच उष्णता आणखी वाढणार असल्याचा सावधगिरीचा इशारा देण्यात आला होता. ज्यामागोमागच धुळीचं वादळ आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यताही हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली. 


वाचा : लालू प्रसाद यादवांचा रेल्वे मंत्रालयाला टोला, म्हणे जरा जास्तच.... 


 


ताशी ५० - ६० किलोमीटर वेगाने वारे वाहणार असल्याचा इशाराही आयएमडीकडून देण्यात आला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये हवामानात काही अनपेक्षित बदल घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. 


दरम्यान, फक्त उत्तर भारतातच नव्हे, तर महाराष्ट्रातही तापमानामध्ये होणारा हा बदल सध्या जनजीवन विस्कळीत करत असल्याचं पाहायला मिळत आहे. कोरोना विषाणूचं आव्हान असतानाच त्यात सूर्याचा दाह अनेकांसाठी अडचणीचा ठरत आहे.