मोठी बातमी: NIAकडून अल-कायदाच्या नऊ दहशतवाद्यांना अटक
या दहशतवाद्यांकडे जिहादी साहित्य, डिजिटल उपकरणे, धारदार शस्त्रे, देशी बनावटीच्या बंदुका, बुलेटप्रुफ जॅकेट आणि स्फोटके कशी बनवायची याची माहिती असलेली पुस्तके आढळून आली.
नवी दिल्ली: अल-कायदा या दहशतवादी संघटनेचे भारतातील जाळे उद्ध्वस्त करण्याच्यादृष्टीने राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून NIA मोठी कारवाई करण्यात आली आहे. NIA च्या पथकांनी पश्चिम बंगाल आणि केरळ येथे टाकलेल्या धाडीत अल-कायदाच्या नऊ दहशतवाद्यांना जेरबंद करण्यात यश आले आहे. प्राथमिक माहितीनुसार, पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद आणि केरळमधील एर्नाकुलम येथे या धाडी टाकण्यात आल्या होत्या. यावेळी संबंधित दहशतवादी राहत असलेल्या ठिकाणी जिहादी साहित्य, डिजिटल उपकरणे, धारदार शस्त्रे, देशी बनावटीच्या बंदुका, बुलेटप्रुफ जॅकेट आणि स्फोटके कशी बनवायची याची माहिती असलेली पुस्तके आढळून आली. NIA कडून या सर्व गोष्टी जप्त करण्यात आल्या आहेत.
NIAकडून ताब्यात घेण्यात आलेल्या या दहशतवाद्यांची सध्या कसून चौकशी सुरु आहे. यापैकी चौघांची ओळख पटलेली आहे. पश्चिम बंगालमधून अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांमध्ये लेऊ येन अहमद आणि अबु सुफियान यांचा समावेश आहे. तर मोसराफ हुसेन आणि मुर्शिद हसन या दोघांना केरळच्या एर्नाकुलन येथून ताब्यात घेण्यात आले होते.
अल-कायदाचे हे दहशतवादी मुख्यत: संघटनेसाठी पैसा उभारण्याचे काम करत होते. यापैकी काहीजण शस्त्रास्त्रे खरेदी करण्यासाठी दिल्लीतही जाणार होते. आगामी काही दिवसांत या दहशतवाद्यांकडून भारतात विविध ठिकाणी घातपात केला जाण्याची शक्यता होती. मात्र, आता त्यांच्या अटकेमुळे हा कट उधळला गेला आहे.