एनएसए अजित डोवाल परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पुन्हा एकदा दिल्लीच्या रस्त्यांवर
देशाच्या राजधानीतील वातावरण सध्या बिघडलं आहे.
नवी दिल्ली : देशाच्या राजधानीतील वातावरण सध्या बिघडलं आहे. दिल्लीत २ दिवसांपासून हिंसा सुरु असताना आज दिल्लीत मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. सीएए वरुन सुरु अललेल्या आंदोलनाने काल अचानक हिंसेचं रुप धारण केलं. ज्यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला असून अनेक जण जखमी आहेत. दिल्ली पोलिसांच्या हातातून परिस्थिती नियंत्रण आणण्याचा प्रयत्न सुरु होता. पण ती हाताळली गेली नाही. त्यानंतर आता राष्ट्रीय सुरक्षा सल्लागर अजित डोवाल हे स्वतः दिल्लीच्या रस्त्यांवर उतरले आहेत.
एनएसए अजित डोवाल यांच्या खांद्यावर आता ही जबाबदारी देण्यात आली आहे. ते पुन्हा एकदा नॉर्थ-ईस्ट दिल्लीच्या सीलमपूर भागात पोहोचले असून परिस्थितीचा आढावा घेत आहेत.
अजित डोवाल यांनी या आधी जाफराबाद, सीलमपूर सह नॉर्थ-ईस्ट दिल्लीच्या अनेक भागांचा दौरा केला. सीलमपूर भागातील डीसीपी ऑफिसमध्ये डोवाल पोहोचले आहेत. डोवाल यांनी यावेळी परिस्थितीचा आढावा घेतला. पंतप्रधानांना ते परिस्थितीचा अहवाल सादर करणार आहेत. पंतप्रधान मोदींनी देखील परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचं म्हटलं आहे.
एनएसए अजित डोवाल हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॅबिनेटला परिस्थितीची माहिती देतील. एनएसए यांनी स्पष्ट शब्दात इशारा दिला आहे की, राजधानीत कोणत्याही प्रकारची हिंसा सहन केली जाणार नाही. मोठ्या प्रमाणात येथे दिल्ली पोलिसांसह अर्धसैनिक दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. स्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांना सूट देण्यात आली आहे.