केवळ `भारत माता की जय` म्हणणे हा राष्ट्रवाद नव्हे- व्यंकय्या नायडू
...तर तुम्हाला तर तुम्हाला `भारत माता की जय` बोलण्याचा अधिकार नाही
नवी दिल्ली: राष्ट्रवाद हा केवळ 'भारत माता की जय' अशी घोषणा देण्याइतपत मर्यादित नाही. सर्वांसाठी 'जय हो' हीच खरी राष्ट्रभक्ती आहे. तुम्ही धर्म, जात, शहरी-ग्रामीण या मुद्यांवरून लोकांशी भेदभाव करत असाल तर तुम्हाला 'भारत माता की जय' बोलण्याचा अधिकार नाही, असे प्रतिपादन देशाचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी केले. ते रविवारी दिल्ली विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना धर्म, जातीयवाद आणि शहरी-ग्रामीण अशा भेदभावापासून दूर राहण्याचे आवाहन केले.
भ्रष्टाचार, निरक्षरता, भीती, भूक आणि जातीवादापासून मुक्त असलेल्या 'न्यू इंडिया'वर देशातील युवकांनी लक्ष केंद्रीत करायला हवे. तरुणांनी समाजातील अनिष्ट प्रथा, कट्टरता आदींविरोधातील लढाईत सर्वात पुढे असायला हवे आणि लैंगिक समानता आदी गोष्टींना प्रोत्साहन द्यायला हवे. आपल्या स्वप्नातील 'न्यू इंडिया'त हेच अपेक्षित आहे. शिक्षणव्यवस्थेतील त्रुटी दूर करणे हा मुद्दाही बऱ्याच काळापासून प्रलंबित आहे. आपल्याला वसाहतवादी दृष्टीकोनाचा त्याग करावा लागेल. तसेच खरा इतिहास आणि प्राचीन नागर संस्कृती आणि परंपरा याबद्दल जाणून घेतले पाहिजे. जेणेकरून विद्यार्थ्यांच्या मनात राष्ट्रभावनेचे बीज पेरले जाईल, असे व्यंकय्या नायडू यांनी म्हटले.
गेल्या काही वर्षांपासून भारतीय अर्थव्यवस्था सातत्याने ७ टक्क्यांपेक्षा अधिक दराने विकसित होत आहे. आगामी १०-१५ वर्षांत भारतीय अर्थव्यवस्था जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होईल, असा अंदाज आहे. त्यामुळे आपण समृद्ध भारतासाठी आणि रामराज्याची सुरुवात करण्याच्यादृष्टीने वाटचाल करायला पाहिजे, असेही नायडू यांनी सांगितले.