नवी दिल्ली : जवळपास गेल्या दोन महिन्यांपासून संपूर्ण देशात थैमान घालणाऱ्या कोरोना Coronavirus व्हायरसमुळं भारतात नागरिकांना मोठ्या प्रमाणात सामना करावा लागला. महाराष्ट्रासह देशातील बहुतांश भागांमध्ये या व्हायरसचा होणारा प्रादुर्भाव पाहता त्यामुळं प्रशासन आणि आरोग्य यंत्रणांपुढे बरीच आव्हानं पाहायला मिळत आहेत. यातीलच सर्वाधिक मोठं आव्हान म्हणजे देशातील रुग्णांचा सातत्यानं वाढणारा आकडा. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार सद्यस्थितीला देशात कोरोना रुग्णांचा एकूण आकडा 1,98,706 वर पोहोचला आहे. तर, आतापर्यंत या व्हायरसच्या विळख्यात आल्यामुळं 5,598 जणांचा जीव गेला आहे. मागील चोवीस तासांमध्ये कोरोमा रुग्णांची झपाट्यानं वाढ झाल्यामुळं ही चिंतेची बाब ठरत आहे. 


'एएनआय' या वृत्तसंस्थेकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या वृत्तानुसार अवघ्या चोवीस तासांमध्ये देशात कोरोना रुग्णांमध्ये नव्यानं 8171 रुग्णांची भर पडली आहे, तर 204 रुग्णाचा कोरोनामिळं मृत्यू झाला आहे. 


एकिकडे देशात कोरोना रुग्णांचा आकडा वाढत असतानाच दुसरीकडे या व्हायरसवर मात करणाऱ्यांची संख्या वाढण्याचं प्रमाणही लक्षणीय आहे. आतापर्यंत तब्बल 95,527 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ज्या धर्तीवर आता कोरोनातून सावरणाऱ्यांचा एकूण सरासरी दर हा 48.07 टक्क्यांवर पोहोचला आहे. 



 


देशभरात दिल्ली, गुजरात आणि महाराष्ट्रात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येत आहे. महाराष्ट्रामध्ये मुंबईत कोरोना अतिशय वेगाने फोफावत आहे. असं असलं तरीही इथेसुद्धा गेल्या काही दिवसांपासून रुग्ण बरे होण्याचं प्रमाण समाधानकारकरित्या वाढलं आहे. त्यामुळं कोरोना रुग्णांचा वाढता आकडा चिंता वाढवत असला तरीही त्यातून सावरणाऱ्यांची संख्या ही काही अंशी दिलासा देऊन जात आहे. त्यामुळं येत्या काळात देश कोरोनाच्या विळख्यातून सुटण्याच्याच दिशेनं यशस्वी वाटचाल करेल असा विश्वास वर्तवण्यास हरकत नाही.